मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांमध्ये रंगणार क्रिकेटचं युध्द. मुली विरुध्द मुलं म्हणजेच अभिनेत्री विरुध्द अभिनेते असा क्रिकेटचा सामना ‘कलाकार बॉक्स क्रिकेट लीग २०१६’ मध्ये पुणे येथे होणार आहे. कलाकारांचा क्रिकेट सामना हा प्रथमच पुण्यामध्ये होत आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ‘कलाकार बॉक्स क्रिकेट लीग २०१६’ सुरु होणार असून २० जून रोजी या सामन्यातील खेडाळूंचा लिलाव अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले आणि सुशांत शेलार यांच्या हस्ते होणार आहे. आपटे रोड येथील रमी ग्रॅण्ड हॉटेलमध्ये प्लेयर ऑक्शन सायंकाळी ६:३० च्या दरम्यान संपन्न होणार आहे.
क्रिडा क्षेत्राविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहित करण्यासाठी ‘कलाकार बॉक्स क्रिकेट लीग २०१६’ चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या निमित्ताने मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग कार्यक्रमात वाढतो आणि प्रेक्षकांना देखील ते आवडतं. पुण्यात हा सामना पहिल्यांदाच होणार असल्यामुळे पुणेकर पण उत्सुक असणार.