घर आणि करिअरचा तुलनात्मक प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 13:05 IST
करिअर, करिअर आणि करिअर..."जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" अशी काहीशी अवस्था ...
घर आणि करिअरचा तुलनात्मक प्रवास
करिअर, करिअर आणि करिअर..."जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" अशी काहीशी अवस्था या करिअरची... लग्न समारंभ असो किंवा साखरपुडा...अगदी बारशापासून ते मुंजीपर्यंत या सगळ्याच समारंभाचा अविभाज्य भाग असलेला प्रश्न म्हणजे, काय मग काय चाललयं? कशात करिअर करायचंय? या आणि अशा अनेक प्रश्नांना हल्लीची पिढी उत्तर देताना दिसते...स्वत:ला अपडेटेड ठेवण्याच्या अट्टाहासाखातर आणि या सगळ्याच प्रश्नांपासून स्वत:ला लांब ठेवण्याच्या हेतूने आजच्या पिढीने आपल्याला या स्पर्धात्मक युगात झोकून दिले आहे. सगळ्या नातेसंबंधांतून स्वत:ला बाहेर काढत एका वेगळ्याच विश्वात ही पिढी वावरते आहे. याच पिढीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या दांपत्याची कथा मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.आपला दृष्टीकोन अचूक मांडून सिनेमाला आकार देणारे दिग्दर्शक दिनेश अनंत यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘डोंबिवली फास्ट’ आणि ‘श्वास’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक असलेले दिनेश अनंत यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक ताजा विषय पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पप्पी दे पारूला तसेच कांताबाईची सेल्फी अशा गाण्यांतून नावारूपाला आलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचा अनोखा अंदाज आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आपल्या या मिसेस अनवॉन्टेडबरोबर क्राईम पेट्रोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला चेहरा राजेंद्र शिसतकर मिस्टर अनवॉन्टेड च्या भूमिकेत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच ते रोमँटिक भूमिकेत दिसणार आहेत.मितांग भूपेंद्र रावल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ही अनोखी कथा प्रकाश गावडे यांनी लिहिली आहे. उर्वी एंटरप्रायजेस प्रस्तुत मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड येत्या 23 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.