Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉमेडी म्हणजे विनोदाची झालर असलेली ‘कॅप्सुल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 18:04 IST

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या मालिकेतून घराघरापर्यंत पोहोचलेल्या समीर चौघुलेने एक उत्कृष्ट अभिनेता व लेखक म्हणून ओळख निर्माण केली आहे. ...

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या मालिकेतून घराघरापर्यंत पोहोचलेल्या समीर चौघुलेने एक उत्कृष्ट अभिनेता व लेखक म्हणून ओळख निर्माण केली आहे. ‘टाईमपास’, ‘कायद्याचं बोला’, ‘आजचा दिवस माझा’ यासारखे चित्रपट आणि ‘यदा कदाचित’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशा काही नाटकांतून तो आपल्याला भेटलेला आहे.चित्रपट, नाटक, टीव्ही आणि लाईव्ह शो असा चौफेर त्याचा वावर. प्रेक्षकांना पोट धरून हसवण्याबरोबरच सामाजिक प्रश्नांबाबत अंतर्मुख करायला भाग पाडणारे लिखाण तो करतो. ‘सीएनएक्स’शी बोलताना त्याने त्याचा आजपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.* तुला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते?खरं सांगायचे तर नाही. मला खेळांमध्ये अधिक रस होता. दहिसरला शिकत असताना मी कबड्डी आणि खो-खो संघाचा कॅप्टन होतो. धावण्याच्या स्पर्धेतही मी आघाडीवर असायचो. अगदी कॉलेजपर्यंत माझा आणि अभिनयाचा काही संबंध नव्हता.* मग या क्षेत्राकडे कसा वळला?कॉलेजमध्ये मला अनेक हौशी मित्रमंडळी मिळाली. पुष्कर श्रोत्री त्यावेळी माझा सिनियर होता. या मित्रांमुळे मी एकांकिकामध्ये काम करू लागलो. मग मला माझे गुरू विश्वास सोहोनी भेटले. त्यांनीच मला नाटकांची गोडी लावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो. अनेक बक्षीसे मिळवली. अशा तºहेने मग माझा हा प्रवास सुरू झाला जो आजतागायत कायम आहे.* ‘विनोदी अभिनेता’ या ओळखीचा त्रास होतो?बिल्कुल नाही. प्रत्येक अभिनेत्याची एक शैली असते. माझा स्वभाव मिश्किल आहे. लोकांना हसवायला मला आवडते. कदाचित त्यामुळे विनोदी कलाकार म्हणून मी लोकांना अधिक भावतो. रोजच्या ताणतणावाच्या जीवनामध्ये जर मी कोणाला दोन क्षण खदखदून हसवू शकलो तर खूप चांगले वाटते. निखळ मनोरंजन करण्याचा माझा प्रामाणिक हेतू असतो. त्यामुळे ‘विनोदी अभिनेता’ हा टॅग मी अभिमानाने स्वीकारतो.* कायम स्मरणात राहील अशी एखादी आठवण?चाहत्यांच्या कौतुकाची थाप जोपर्यंत पाठीवर पडत नाही तोपर्यंत कलाकाराला आनंद होत नसतो. ८० वर्षांच्या एक आजीबाई माझे सर्व एपिसोड पाहतात. त्यांना टाईप करता येत नाही म्हणून मग त्या आवाज रेकॉर्ड करून मला मेसेज पाठवत असतात. अनेक सैनिक सोशल मीडियावर मला त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात. देशाच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या सैनिकांना माझ्यामुळे आनंद मिळतो म्हटल्यावर मला माझ्या कामाचे खरे समाधान मिळते.                                                                      कॉमेडीची बुलेट ट्रेन : समीर चौघुले* आता तर तू लेखक म्हणून ओळख निर्माण केली आहे...होय. बरं लेखक होण्याचासुद्धा मी विचार केला नव्हता. मारून कुटून बनलेला लेखक म्हणजे मी. स्वत:चे विनोदी स्कीटस् तर मी लिहितोच पण त्यासोबतच मालिकांसाठीसुद्धा लिहितो. नुकतेच एका चित्रपटाची पटकथासुद्धा मी पूर्ण केली आहे. शिवाय वर्तमानपत्रामध्ये पण लिहितो. लिखाणामुळे माझ्यातील अभिनेता अधिक  विकसित होतो असे मला वाटते. * मग वेळेचे गणित कसे जमवतो?कामाच्या बाबतीत मी फार शिस्तप्रिय आहे. दिवसाचे काटेकोर नियोजन करून मी काही काळ लिखाणासाठी राखीव ठेवतो. लिखाण आणि अभिनयाचा समतोल साधून वेळेचे गणित शिस्तीने पाळले की जमते सगळे.* चित्रपटांतील तुझ्या छोट्या-छोट्या भूमिकासुद्धा खूप गाजतात...माझ्या लेखी भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते. आता ‘टाईमपास’मध्ये माझा केवळ एकच सीन आहे. पण तो प्रचंड गाजला. दिग्दर्शक रवी जाधवच्या मनात ती भूमिका केवळ मीच केली पाहिजे असे होते. आपण निष्ठेने काम केले तर त्याचे फळ आपोआप मिळते. तसंच ‘कायद्याचं बोला’मधील ‘तंबी’ या भूमिकेचे आहे. गाड्यांचे नंबर लक्षात ठेवणाऱ्या हा साउथ इंडियन ‘तंबी’ची आजही लोक आठवण काढतात.* सामाजिक प्रश्नांवर विनोदाच्या माध्यमातून भाष्य करणे कितपत परिणामकारक आहे?खूप परिणामकारक आहे. एखाद्या समस्येची प्रेक्षकांना जाणीव करून देण्यासाठी कॉमेडी सर्वोत्तम माध्यम आहे. कारण कॉमेडी कॅप्सुलचे काम करते. म्हणजे ज्याप्रमाणे गोळ्यांऐवजी कॅप्सुल अधिक आवडीने घेतली जाते, तसेच कॉमेडीचे आहे. विनोदाची झालर असलेली ही कॅप्सुल समस्येवर बरोबर बोट ठेवते. मनोरंजन आणि प्रबोधन असा दुहेरी फायदा होतो.