Join us

कॉमेडीयन नम्रता आवटे-संभेरावच्या चिमुकल्याचे ठेवले हे नाव, सोशल मीडियावर होतोय जयजयकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 16:14 IST

मराठी अभिनेत्री आणि प्रसिद्ध कॉमेडीयन नम्रता आवटे-संभेराव हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

क्रांती रेडकर, रश्मी अनपट या अभिनेत्रींपाठोपाठ मराठी अभिनेत्री आणि प्रसिद्ध कॉमेडीयन नम्रता आवटे-संभेराव हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या बाळाचे नुकतेच बारसे झाले असून त्याचे नाव नम्रताने सोशल मीडियावर जाहीर केले आहे. नम्रताने या चिमुकल्याचे नाव रुद्राज असे ठेवले आहे.

नम्रता आवटे-संभेराव हिने इंस्टाग्रामवर आपल्या बाळाचे नाव जाहीर करत लिहिले की, सोनू बाळा बाबू बच्चू पिल्लू अशा अनेक नावानी पोट माझं भरलंय आणि अखेर माझं खरं नाव ठरलंय रुद्राज.

या पोस्टवर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी शुभेच्छा देत असून एका दोघांनी रुद्राज महाराज की जय अशी कमेंट केली आहे.

नम्रताने योगेश संभेराव याच्यासोबत लग्न केले आहे. १६ मार्चला एका नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याची आनंदाची बातमी नम्रताने सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर मित्र, नातेवाईक आणि फॅन्सकडून या दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. त्यांच्या घरात आलेल्या या नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे नम्रता आणि पती योगेश संभेराव दोघे चांगलेश खुश आहेत.

दोघांनी शुभेच्छा देणारे आपले हितचिंतक, मित्र आणि फॅन्सचे आभार मानलेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमधून तिच्यातील विनोदी गुणांचं पहिल्यांदा दर्शन झालं. यानंतर तिने कॉमेडीची बुलेट ट्रेन हा शो आपल्या कॉमेडीने गाजवला. यामुळे नम्रताला वेगळी ओळख मिळाली. यानंतरच्या काळात नम्रताने आपल्या अभिनयाची जादू रुपेरी पडद्यावरही दाखवली.

'व्हेंटिलेटर', 'बाबू बँड बाजा', 'लूज कंट्रोल' यासारख्या विविध चित्रपटात नम्रताने महत्वाच्या भूमिका साकारल्या. यासोबतच तिने हिंदीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली.  आदत से मजबूर या हिंदी मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली. याशिवाय रंगभूमीही नम्रताने गाजवली. आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल या नाटकांमधील तिच्या भूमिकांचे विशेष कौतुक झालं.  

टॅग्स :नम्रता आवटे संभेराव