Join us

क्लॅप बॉय बनला दिग्दर्शक, 'जिप्सी'सिनेमाचे दिग्दर्शन करणार, लवकरच शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 16:40 IST

आतापर्यंत २५ हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक  दिग्दर्शक अशा विविध जवाबदाऱ्या निभावल्यानंतर शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट करत आहेत.

कलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. त्यावर मात करत कलेसाठी सर्वस्व पणाला अर्पण करणारे समाजात मोजकेच असतात. अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे शशि चंद्रकात खंदारे यांची.  सिनेमा बनवण्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. गेल्याकाही वर्षांपासून ते या क्षेत्रात धडपड करत आहे.अखेर मोठ्या मेहनतीने त्यांनी पाहिलेलं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. 

"जिप्सी" हा शब्द मराठी माणसांना कविवर्य मंगेश  पाडगावकर यांच्या कवितेमुळे माहीत आहे. पण आता याच नावाचा चित्रपट येऊ घातला आहे. "जिप्सी" या चित्रपटातून शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे क्लॅपबॉय ते दिग्दर्शक असा शशि चंद्रकांत खंदारे यांचा प्रवास आहे. "जिप्सी" या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आलं. यश मनोहर सणस त्यांच्या यश सणस फिल्म्स या निर्मिती संस्थेद्वारे बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने "जिप्सी" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

आतापर्यंत २५ हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक  दिग्दर्शक अशा विविध जवाबदाऱ्या निभावल्यानंतर शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट करत आहेत.चित्रपटाची कथा ही त्यांचीच आहे. पुढील महिन्यात चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यात चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. 

"जिप्सी" या नावातून हा चित्रपट प्रवासावर आधारित असणार हे स्पष्ट आहे. पण टीजर पोस्टरमध्ये मोकळं आकाश दिसत असल्यानं चित्रपटाची कथा काय असेल याची उत्सुकता या नावामुळे निर्माण झाली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.