अभिजात चित्रपटांच्या शौकिनांसाठी रंगणार चित्रभारती चित्रपट महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 10:08 IST
प्रभात चित्र मंडळाच्या वतीने ‘चित्रभारती’चे आयोजन ठाणे आर्ट गिल्ड आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट माटुंगा, याच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.१५ मे ...
अभिजात चित्रपटांच्या शौकिनांसाठी रंगणार चित्रभारती चित्रपट महोत्सव
प्रभात चित्र मंडळाच्या वतीने ‘चित्रभारती’चे आयोजन ठाणे आर्ट गिल्ड आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट माटुंगा, याच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.१५ मे ते १८ मे दरम्यान वेलिंगकर इन्स्टिट्यूट येथे चित्रभारती चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रसिकांना ८ दर्जेदार चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.चार दिवसांच्या या चित्रपट महोत्सवात विविध भारतीय भाषांमधील, राष्ट्रीय पातळीवरील आठ दखलपात्र चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. आस्वादक वृत्ती वाढीस लागावी आणि समाजाची अभिरूची घडावी, यासाठी अभिजात चित्रपट हे एक सक्षम माध्यम आहे. व्यावसायिक प्रवाहातले लोकप्रिय सिनेमे सहज बघायला मिळतात. मात्र, कसदार सिनेमे बघण्यासाठी अनेकदा वाट वाकडी करावी लागते. बऱ्याचदा इच्छा असूनही दर्जेदार, अभिजात चित्रपट बघण्याची संधी मिळत नाही. म्हणूनच निवडक आठ चित्रपटांचा खजिना या चित्रपट महोत्सवाच्या रुपाने खुला करण्यात येणार आहे.गेली अनेक वर्षे सुजाण चित्रपट रसिक घडवण्याचा वसा घेतलेले प्रभात चित्र मंडळ यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५मे रोजी सायं. ६ वाजता चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ ‘मयत’ या मराठी लघुपटाने होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलावंताचा सन्मान करण्यात येणार आहे.मंकी बात (मराठी), थोंडीमुथलम ध्रिक्सक्षियम (मल्याळी), कच्चा लिंबू (मराठी), टेक ऑफ (मल्याळी), इशु (असामी), सर्वनाम (मराठी) या चित्रपटांबरोबरच साउंड ऑफ सायलेन्स या तिबेटिअन चित्रपटाचाही आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.भारतीय सिनेसृृष्टीत अतिशय मानाच्या समजल्या जाणा-या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सुयश शिंदे दिग्दर्शित ‘मयत’ हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. या लघुपटाच्या ट्रेलर अवघ्या काही सेकंदांत दाहक वास्तवाची जाणीव आपल्याला होते.कलाकारांचा अभिनय आणि राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवणाऱ्या या लघुपटाला प्रेक्षकांचा कसा प्रसिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.