चिन्मय उद्गिरकर झळकणार गुलाबजाममध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 17:21 IST
सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या गुलाबजाम या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. या चित्रपटाची ...
चिन्मय उद्गिरकर झळकणार गुलाबजाममध्ये
सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या गुलाबजाम या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले होते आणि त्यासोबतच आमच्या रेसिपीला सुरूवात झाली असे कॅप्शन देण्यात आले होते. सचिन कुंदलकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून वजनदारनंतर त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.या चित्रपटात सोनाली आणि सिद्धार्थ हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे हे या चित्रपटाच्या पोस्टरवरून आपल्याला कळत आहे. पण या चित्रपटात या दोघांची भूमिका काय आहे याबाबत या दोघांनी मौन राखणेच पसंत केले आहे. तसेच या चित्रपटात या दोघांशिवाय आणखी कोण कलाकार आहेत हेदेखील या चित्रपटाच्या टीमने गुलदस्त्यातच ठेवले आहे. स्वप्नाच्या पलीकडे या मालिकेमुळे चिन्मय उद्गिरकर हे नाव घराघरात पोहोचले. नुकतेच तो नांदा सौख्यभरे या मालिकेत झळकला होता. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. चिन्मयदेखील गुलाबजाम या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सोनाली कुलकर्णीने ट्विटर या सोशल नेटवर्किंगला पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे ही गोष्ट चिन्मयच्या फॅन्सना कळली आहे. सोनालीने ट्वीटमध्येम्हटले आहे की, गुलाबजामचे पुण्यात भल्या पहाटे शूट सुरू आहे. या चित्रीकरणाच्यावेळी अमृततुल्य चहा दिग्दर्शक सचिन कुंदलकर आणि सहकलाकार चिन्मय उद्गिरकरसोबत. चिन्मय आणि सचिनसोबत तिने एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. यावरूनच चिन्मय या चित्रपटात असल्याचे सगळ्यांना कळले आहे. पण या चित्रपटात त्याची भूमिका काय असणार याबाबत अद्याप तरी मौन पाळण्यात आले आहे.