'अमर फोटो स्टुडिओ'ची सेंच्युरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 15:30 IST
'अमर फोटो स्टुडिओ'ची रंगभूमीवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. नाट्य रसिकांची या नाट्यकृतीला चांगलीच दाद मिळत आहे. या नाटकातील कलाकारांचा ...
'अमर फोटो स्टुडिओ'ची सेंच्युरी !
'अमर फोटो स्टुडिओ'ची रंगभूमीवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. नाट्य रसिकांची या नाट्यकृतीला चांगलीच दाद मिळत आहे. या नाटकातील कलाकारांचा दमदार अभिनय आणि अनोखा विषय यामुळे अमर फोटो स्टुडिओला रसिकांचं प्रेम लाभतंय. नाट्य रसिकांनी दिलेल्या भरभरुन प्रेमामुळे लवकरच अमर फोटो स्टुडिओची सेंच्युरी होणार आहे. या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग येत्या 28 मे रोजी पार पडणार आहे. मांटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर इथं दुपारी 4 वाजता हा शंभरावा प्रयोग रंगणार आहे. मनोरंजनाची फुल ऑन मेजवानी रसिकांना या नाटकाच्या माध्यमातून मिळत आली आहे. त्यामुळेच या नाटकाने यंदा महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा तसेच विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. तरुणाईची अचूक नस ओळखणा-या निपुण धर्माधिकारी यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मनस्विनी लता रविंद्र यांनी नाटकाचं लेखन केलं आहे. नेहमीच प्रेक्षकांच्या अभिरुचीचा विचार करत अनेक चांगल्या नाट्यकृती रसिकांना देणा-या सुबकने या नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाच्या यशात अभिनेता सुनील बर्वे यांचाही मोलाचा वाटा आहे. सुरुवातीपासूनच हे नाटक विशेष चर्चेत आलं. नाटकाचं अनोखं प्रमोशन यामुळे नाटकाची विशेष चर्चा रंगली. त्यातच अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे या कलाकारांच्या अफलातून अभिनयानं नाटकाला चारचाँद लावले आणि अल्पावधीतच लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. आता शंभराव्या प्रयोगाच्या निमित्ताने हे नाटक एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहचलं आहे. अवघ्या काही दिवसांत शंभर प्रयोगांचा टप्पा गाठणा-या नाटकाच्या विविध ठिकाणी होणा-या प्रयोगांनाही रसिकांची भरभरुन दाद मिळत आहे. रसिकांचं हेच प्रेम शंभराव्या प्रयोगानंतरही कायम मिळत राहावे अशीच अपेक्षा नाटकाच्या टीमकडून व्यक्त करण्यात येत आहे.