Join us

अभिनय सावंतच्या भावी पत्नीने दिले खास सरप्राईज,वाढदिवसाचं असं केलं जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 15:10 IST

आपल्या आई वडिलांचा वारसा चालवत अभिनयाच्या दुनियेत त्यांच्या मुलांनी कमाल केल्याची अनेक उदाहरणं आहेत. याच यादीतील एक मराठमोळं नाव ...

आपल्या आई वडिलांचा वारसा चालवत अभिनयाच्या दुनियेत त्यांच्या मुलांनी कमाल केल्याची अनेक उदाहरणं आहेत. याच यादीतील एक मराठमोळं नाव म्हणजे अभिनेता अभिनय सावंत. बालपणापासून अभिनयाचे बाळकडू घरातून मिळालेल्या अभिनयने केदार शिंदे यांच्या श्रीमंत दामोदर पंत या मराठी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मराठी सिनेमासह छोट्या पडद्यावरही त्याच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' या मालिकेतून तो घराघरात पोहचला. रसिकांचा लाडका बनलेला अभिनय लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. १२ वर्षापासूनची मैत्रीण पूर्वा पंडीतसह तो रेशीमगाठीत अडकणार आहे. २८ ऑक्टोबरला दोघांचा साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्नबंधनात अडकतील.पूर्वा ही देखील अभिनेत्री असून तिने रंगभूमीवर काम केले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून तिने शिक्षण घेतले आहे.पूर्वाने तिच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर तिचा आणि अभिनयचा साखरपुड्याचा फोटो टाकून अभिनयच्या फॅन्सना साखरपुडा झाल्याची गोड बातमी दिली होती.दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. हेच प्रेम ते या ना त्या पद्धतीने व्यक्त करत असतात.अभिनयाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली आहे.पूर्वाने अभिनयचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या रोमँटिक शुभेच्छा दिल्या आहेत. "तुला पाहते तेव्हा माझं सारं आयुष्य यापुढे तुझ्यासोबत घालवणार तेच माझ्या डोळ्यासमोर येतं.गेली अनेक वर्षे मला साथ दिल्याबद्दल आणि सगळ्या गोष्टी शेअर केल्याबद्दल तुझे आभार. हॅपी बर्थडे हँडसम" अशा शब्दांत पूर्वाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भावी पत्नीकडून मिळालेल्या या रोमँटिक शुभेच्छांमुळे अभिनयचा वाढदिवस स्पेशल बनला आहे.अभिनय सावंत म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा लेक आहे.निर्मिती सावंत.आपल्या अभिनयानं आणि कॉमेडीच्या अफाट टायमिंगनं त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा लेक अभिनयही या मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनयात करियर करण्यासाठी त्याने कधीही आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. या क्षेत्रात येण्याआधी शिक्षण पूर्ण करण्याची अट आपल्या आईने घातल्याचं त्यानं सांगितलं होतं.