Join us

बॉलिवुडचा आवाज मराठीत घुमतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 14:36 IST

  प्रियांका लोंढे           मराठी चित्रपटसृष्टीची भुरळ सध्या अनेक कलाकारांना पडली आहे. बॉलिवुडच काय पण थेट ...

  प्रियांका लोंढे
           मराठी चित्रपटसृष्टीची भुरळ सध्या अनेक कलाकारांना पडली आहे. बॉलिवुडच काय पण थेट सातासमुद्रापलीकडील कलाकार मराठी चित्रपटांमध्ये झळकत आहेत. अभिनयच नाही तर संगीतक्षेत्रालाही मराठी चित्रपटसृष्टी खुणावू लागली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज गायकांनी आपल्या जादुई आवाजाची मोहोर मराठीत उमटवली आहे. मन्ना डे, किशोर कुमार, सोनू निगम, शंकर महादेवन, श्रेया घोषाल, विशाल दादलानी आणि शान यांसारख्या बॉलिवुडमधील प्रसिद्ध गायकांनी आतापर्यंत मराठीत पार्श्वगायन केले आहे. मराठी चित्रपटात गाणाऱ्या या बॉलिवुडमधील गायकांवर एक नजर टाकूयात...
 
किशोर कुमार : गंमत जंमत या चित्रपटातील अश्विनी ये ना... हे गाणे किशोर कुमार यांनी गायले होते. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार्सना आवज देणाऱ्या किशोर कुमार यांनी अशोक सराफ आणि चारुशिला साबळे यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याला आवाज दिला होता. हे गाणे त्यांनी अफलातून गायले होते. आजही या गाण्याची जादू रसिकांच्या मनावर आहे. 
 
 सोनू निगम : सचिन पिळगांवकर आणि सोनू निगम यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे.  आपल्या मित्राने आपल्यासाठी पार्श्वगायन करावे असे सचिन पिळगांवकर यांना वाटले आणि नवरा माझा नवसाचा या चित्रपटात सोनूने गाणे गायले. हिरवा निसर्ग... हे सोनूने गायलेले गाणे प्रचंड गाजले होते. त्यानंतर दुनियादारी या चित्रपटात टिक टिक वाजते डोक्यात या गाण्याला सोनूने आवाज दिला.
 
शंकर महादेवन : बॉलिवूडमधील आघाडीचे संगीत दिग्दर्शक आणि गायक म्हणून शंकर महादेवन यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे अगं बाई अरेच्चा चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. कट्यार काळजात घुसली या चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मन मंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली. 
 
 श्रेया घोषाल : अतिशय सुंदर गाणी गाऊन रसिकांची मने जिंकलेल्या श्रेयानेदेखील अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. जोगवा चित्रपटात श्रेयाने गायलेले जीव रंगला हे गाणे प्रचंड हिट झाले होते. तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलेल्या सैराट या चित्रपटातील आताच बया का बावरलं हे गाणे तिने गायले आहे. 
 
 शान : शानच्या आवाजात एक वेगळीच नशा आहे. वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्यासाठी शान ओळखला जातो. चिन्मय मांडलेकर आणि गायत्री सोहम यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले रेती या चित्रपटातील एक थीम साँग शानने गायले होते. तसेच प्रकाश कुंटे यांच्या आगामी सायकल या सिनेमात तो गाणार आहे.