अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने हिंदी सिनेइंडस्ट्रीतही आपली छाप उमटविली आहे. नुकतीच सोनाली सुशीला सुजीत सिनेमात झळकली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान आता एका मुलाखतीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बॉलिवूड कलाकार आणि ड्रग्जबद्दलचा मोठा खुलासा केला आहे.
बॉलिवूडमधील कलाकार वजन घटविण्यासाठी ड्रग्सचा वापर करत असल्याचा खुलासा सोनालीने केला आहे. सोनाली कुलकर्णी स्वतःला फिट ठेवण्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम करते. मात्र ड्रग्सचा वापर करण्याला तिचा विरोध आहे. सिनेइंडस्ट्रीत वजन घटवण्याचा ट्रेंड वाढला आहे. ती म्हणाली की, "मला कल्पना आहे की याची मागणी आहे, कारण मी इंडस्ट्रीत काम करते. तुम्ही जितके बारीक असाल, तितके तुम्ही पडद्यावर चांगले दिसता. माझ्या अनेक मैत्रिणींना खाल्लेलं अन्न उलट्या करण्याची सवय आहे. त्या वजन कमी करण्याची औषधेही घेत आहेत."
''आरोग्याची किंमत देऊन मला बारीक व्हायचं नाही''
सोनाली पुढे म्हणाली की,"मी माझ्या आयुष्यात अशा टप्प्यावर आहे, जिथे मी स्वतःला प्राधान्य देते. मी स्वतःला सांगत असते की मी स्पेशल आहे. माझी साइज ही माझी साइज आहे. माझ्या आरोग्याची किंमत देऊन मला बारीक व्हायचं नाही. मला वाटतं की आपण हे सगळे कशाच्या किंमतीवर घेत आहोत? जोपर्यंत तुमच्या डॉक्टरांनी ते लिहून दिलेले नाही, तोपर्यंत तुम्ही ते का घेत आहात? याचा त्रास नेहमी तुमच्या जवळच्या लोकांना होतो.