Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयासोबतच स्वयंपाकातही मास्टर! 'बिग बॉस'मधून बाहेर येताच राकेश बापटने बनवला 'हा' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 13:22 IST

राकेशने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात त्याने आपले कुकिंग स्किल दाखवले.

Raqesh Bapat : 'बिग बॉस मराठी'चा सीझन ६ काही दिवसांपूर्वीच संपला. अभिनेत्री तन्वी कोलते या सीझनची विजेती ठरली. तर राकेश बापट दुसऱ्या क्रमांकावर होता. उपविजेता ठरलेल्या राकेशनं आता 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर एक खास पदार्थ बनवला आहे.  राकेशनं फक्त अभिनयातच नाही, तर स्वयंपाकातही आपला हातखंडा असल्याचं दाखवून दिलं आहे. 

पुण्यात आपल्या घरी परतलेल्या राकेशने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात त्याने आपले कुकिंग स्किल दाखवले. राकेशने आपल्या लाडक्या भाचीसोबत म्हणजेच ईशासोबत मिळून 'मँगो स्टिकी राईस' (Mango Sticky Rice) हा लोकप्रिय पदार्थ बनवला. व्हिडीओमध्ये राकेश म्हणतो, "बिग बॉसच्या घरातून आता मी माझ्या स्वतःच्या घरी आलो आहे. घरी आल्यावर मी माझा आवडता पदार्थ बनवणार आहे". 

अशी आहे राकेशची 'स्पेशल रेसिपी'राकेशने अतिशय सोप्या पद्धतीने हा पदार्थ कसा बनवायचा, हे व्हिडीओत दाखवले आहे. रात्रभर भिजवलेला तांदूळ मलमलच्या कापडात गुंडाळून २० मिनिटे वाफवून घेतला. नारळाचा सॉस बनवण्यासाठी राकेश म्हणतो, "एका कढईत एक कप कोकोनट मिल्क घालायचे. ते कोमट झाल्यानंतर एक तृतीयांश कप साखर घालायची आहे. ती साखर त्यात विरघळू द्यायची. अर्धा चमचा मीठ घालायचं". यानंतर वाफवून घेतलेल्या तांदळात  ८० टक्के नारळाचं सूप घालायचं. त्यानंतर ते मिश्रण २० मिनिटं ठेऊन द्यायचं.

टॉपिंग सॉस बनवण्यासाठी राकेश सांगतो, अर्धा कप कोकोनट मिल्क आहे, ते पातेल्यात घ्यायचं. थोडीशी साखर, मीठ, कॉर्न स्टार्च टाकायचं. ते थो़डंसं घट्ट होऊ द्यायचं. आता आम्ही आंबा कापून घेतला आहे, सॉस आणि भातही तयार आहे, त्याला आता डेकोरेट करायचं". यानंतर राकेश एका प्लेटमध्ये भात ठेवतो, त्याच्या बाजूला कापलेला आंबा ठेवतो, त्यावर सॉस टाकतो. पुढे त्यावर तो भाजलेले तीळ टाकतो. शेवटी ईशा व राकेश "आम्हाला हा पदार्थ जमला आहे" असं म्हणतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Raqesh Bapat: 'Bigg Boss' fame shows cooking skills, makes mango dish

Web Summary : After 'Bigg Boss', Raqesh Bapat showcased his culinary talent by making Mango Sticky Rice with his niece. He shared an easy-to-follow recipe, demonstrating his skills beyond acting.
टॅग्स :राकेश बापटबिग बॉस मराठी ६