Join us

'बिग बी'सुद्धा भारावले, १२,५००व्या प्रयोगानिमित्त प्रशांत दामलेंना दिली खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 16:15 IST

Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या गाजलेल्या नाटकाने म्हणजेच 'एका लग्नाची गोष्ट'ने नुकतेच १२, ५०० प्रयोगाचा विक्रमी टप्पा पार केला आहे.

मराठी रंगभूमी गाजवलेले नट असं म्हटलं तर आपल्या सर्वांसमोर एकच नाव उभं राहतं ते  म्हणजे अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं. आजवर प्रशांत दामलेंनी बऱ्याच नाटकात काम केले आहे. मराठी रंगभूमी जगलेला नट म्हणून प्रशांत दामलेंची ओळख आहे. नुकतेच प्रशांत दामलेंच्या गाजलेल्या नाटकाने म्हणजेच 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाने १२, ५०० प्रयोगाचा विक्रमी टप्पा पार केला आहे. त्यांच्या या  १२, ५०० व्या प्रयोगासाठी प्रशांत दामलेंना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडून खास भेट मिळाली आहे. 

अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांना त्यांच्या एका लग्नाची गोष्ट या नाटकासाठी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बींनी हे नाटक पाहायला गेलेल्यांचा एक फोटो पोस्ट शेअर करत लिहिले की, प्रशांत दामले यांचा १२,५०० प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. फक्त ३९ वर्षांत एवढे प्रयोग करणं ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे! मी प्रशांतजींच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाच्या १००० व्या प्रयोगाला गेलो होतो आणि तेव्हापासून मी प्रशांतजींच्या कामाचा चाहता आहे. आजही लोकांना मराठी नाटकावर प्रेम करायला लावण्यात प्रशांतजींचं मोठं योगदान आहे. आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना आणि सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा!

 ही पोस्ट शेअर करत बिग बी सुद्धा भारावले दिसून आले. तसंच बिग बींसोबतच प्रशांत दामलेंच सिनेसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव होतोय. बिग बींनी शेअर केलेली ही रिपोस्ट करत प्रशांत दामलेंनी बिग बींचे आभार मानलेत. " धन्यवाद सर, कलाकारांना पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणार्‍या माणसाकडून असे कौतुकाचे शब्द येणे खरोखरच खूपच नम्र आहे." असं प्रशांत दामलेंनी ही पोस्ट शेअर करत म्हटले आहे. 

तसेच नुकताच प्रशांत दामलेंचा एका लग्नाची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग पार पडला. यावेळी या प्रयोगाला राजकिय क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याच्या या प्रयोगाला हजेरी लावली होती. 

टॅग्स :प्रशांत दामलेअमिताभ बच्चन