महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. मुंबईतील लालबाग परिसर म्हणजे गणेशोत्सवाची पंढरीच आहे. या ठिकाणी अनेक लोकप्रिय गणपती पंडाल आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लालबागचा राजा. देश विदेशातून लोक राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. त्याच्या दर्शनासाठी भाविक तासन् तास रांगेत उभे असतात. तर दुसरीकडे सेलिब्रिटी, व्हीएआयपींना मात्र थेट दर्शन मिळतं. नुकतंच अभिनेता भूषण प्रधानने (Bhushan Pradhan) राजाचं दर्शन घेतलं. याचा त्याने व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्याने दिलेलं कॅप्शन वाचून त्याचं कौतुक होत आहे.
भूषण प्रधानने लालबागचा राजाच्या चरणी डोकं ठेवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हात जोडून त्याने राजाचा आशीर्वाद घेतला. यावेळी भूषणने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.पोस्टसोबत भूषणने कॅप्शनमध्ये लिहिले, "हात जोडून, नतमस्तक होऊन आशीर्वाद मागतो.. तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या प्रत्येकासाठी! बाप्पा, तुझे आशीर्वाद प्रत्येक घरात, प्रत्येक हृदयात,प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचोत. गणपती बाप्पा मोरया!"
भूषणने दिलेल्या या कॅप्शनने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. 'सर तुम्ही स्वतःसाठी काही न मागता सगळ्यांसाठी बाप्पा कडे सुख मागताय.म्हणूनच तुम्ही खूप स्पेशल आहात','तुम्ही नमस्कार करत असताना बाप्पा ने एक फूल तुमच्या डोक्यावर टाकलं', 'बाप्पााकडे खूप छान आशीर्वाद मागितला' अशा कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत.
भूषण प्रधानचा 'घरत गणपती' सिनेमा गेल्यावर्षी रिलीज झाला होता. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर आलेला हा सिनेमा तुफान चालला. सिनेमाची अफाट लोकप्रियता पाहता यावर्षी हा सिनेमा थिएटरमध्ये रि रिलीज करण्यात आला आहे.