मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची पुढची पिढीही सध्या कार्यरत आहे. प्रिया बेर्डे, केदार शिंदे, सचिन पिळगावकर, रमेश-सीमा देव, लोकेश गुप्ते अशा अनेक कलाकारांची मुलं आज मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचं नाव कमवत आहेत. पण काही कलाकार याविषयी अपवादही असतात. असेच कलाकार म्हणजे भरत जाधव. मराठी सिनेसृष्टी स्वतःचं नाव कमावणारे भरत जाधव (bharat jadhav) यांची दोन्ही मुलं इंडस्ट्रीपासून दूर आहेत. भविष्यात ते मनोरंजन विश्वात सक्रीय दिसणार का, याविषयी विचारलं असता भरत जाधव काय म्हणाले जाणून घ्या.
भरत जाधव मुलांविषयी पहिल्यांदाच बोलले
लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत भरत जाधव यांना त्यांच्या मुलांविषयी विचारण्यात विचारलं. भरत जाधव यांची दोन्ही मुलं आगामी काळात मनोरंजन सृष्टीत दिसणार का? असा प्रश्न विचारला असता भरत जाधव म्हणाले की, "काही संबंध नाही. आताच नाही तर, लहान असताना पण मी आणि बायको कोणत्या कार्यक्रमाला जात असू तर आम्ही त्यांनाही विचारायचो की, चला जाऊया आपण. तर ते नाही म्हणायचे. तुम्ही जा, असं सांगायचे आम्हाला."
"ते दोघेही तसेच आहेत. ग्लॅमर दुनियेपासून ते लांब आहेत. एवढंच काय, ते जेव्हा शाळेत होते, तेव्हा त्यांना सोडायला गाडी जायची. तेव्हा गाडीपण ते दोघं लांब उभी करायला लावायचे. शाळा सुटल्यावर सुद्धा एके ठिकाणी गाडी उभी असायची. मग ते दोघे चालत तिथे गाडीपर्यंत यायचे. आणि मग गाडीत बसून घरी यायचे. तेव्हापासून ते दोघे अलिप्त आहेत. अलिप्त म्हणजे त्यांना ग्लॅमर वगैरे नको असतं. त्यापासून ते दूर आहेत." अशाप्रकारे भरत जाधव यांनी त्यांच्या मुलांविषयी खुलासा केला. भरत यांना आरंभ हा मुलगा असून सुरभी ही मुलगी आहे. भरत जाधव यांची भूमिका असलेला 'आता थांबायचं नाय' हा सिनेमा १ मे रोजी महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.