भरत जाधव हे मराठीतील लोकप्रिय आणि कायमच आदराने घेतलं जाणारं नाव आहे. अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या भरत जाधव यांनी अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं. 'पछाडलेला', 'जत्रा', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'क्षणभर विश्रांती', 'खो खो', 'वन रुम किचन', 'मुंबईचा डबेवाला', 'साडे माडे तीन' अशा सुपरहिट सिनेमांतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. आता 'दशावतार' या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो 'दशावतार' सिनेमा अखेर आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गुरुवारी(११ सप्टेंबर) 'दशावतार' सिनेमाचा प्रिमियर पार पडला. या प्रिमियरला भरत जाधव यांनी त्यांच्या पत्नीसोबत हजेरी लावली होती. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत भरत जाधव पत्नीसह प्रसारमाध्यमांना फोटो देताना दिसत आहेत. अभिनेत्याप्रमाणेच त्याची पत्नीही अत्यंत साधी राहणीमान ठेवणारी आहे. विशेष म्हणजे नवरा सुपरस्टार असूनही त्या दोघांचेही पाय जमिनीवर आहेत. व्हिडीओत त्यांच्या चेहऱ्यावर गर्वाचा लवलेशही दिसत नाहीये.
भरत जाधव आणि त्यांच्या पत्नीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आदर्श कपल म्हणून या जोडप्याचं कौतुक होत आहे. दरम्यान, 'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने दशावतारी नाटक रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.