बेस्ट डेपोचा झाला डान्सबार,अधिका-यांनी या मराठमोळ्या अभिनेत्रीवर उधळल्या नोटा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 13:46 IST
मराठी अभिनेत्री माधवी जुवेकरचा एक संतापजनक आणि तितकाच हिडीस डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ...
बेस्ट डेपोचा झाला डान्सबार,अधिका-यांनी या मराठमोळ्या अभिनेत्रीवर उधळल्या नोटा!
मराठी अभिनेत्री माधवी जुवेकरचा एक संतापजनक आणि तितकाच हिडीस डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बेस्टच्या वडाळा आगारातील आहे. या व्हिडीओत बेस्टचे अधिकारी डान्स करत अभिनेत्री माधवी जुवेकर हिच्यावर नोटा उधळताना पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री माधवी जुवेकर ही बेस्टमध्ये नोकरी करते. बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कशाप्रकारे धांगडधिंगा घालण्यात आला याची साक्ष देणारा हा व्हिडीओ समोर आला आहे. बेस्टच्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागातील ही घटना आहे. बेस्टमध्ये नोकरीला असणारी माधवी जुवेकर गाण्याच्या तालावर हिडीस डान्स करत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. माधवी डान्स करत असताना बेस्टच्या अधिका-यांकडून तिच्यावर नोटा उधळण्यात येत आहेत. खुद्द माधवी जुवेकरसुद्धा तोंडात नोटा घेऊन संतापजनक नृत्य करत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एकीकडे बेस्टचे चाक तोट्यात अडकले आहे. बेस्टच्या कर्मचा-यांना पगार वेळेवर मिळत नाही. यामुळेच काही दिवसांपूर्वी बेस्ट कर्मचा-यांवर संप करण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितीत माधवी जुवेकरचं असं हिडीस नृत्य आणि बेस्टच्या अधिका-यांचे दौलतजादा उधळणं यामुळे सामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची बेस्टनं गंभीर दखल घेतल्याचे समजतं आहे. बेस्ट डेपोचा डान्स बार करणा-या या बेस्टच्या अधिका-यांवर आणि माधवी जुवेकरवर बेस्ट प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता नजरा लागल्या आहेत.अभिनेत्री माधवी जुवेकर हिने मराठी सिनेमा, विविध मराठी मालिका आणि कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतला आहे. आपल्या अभिनयामुळे आणि कॉमेडीच्या टायमिंगमुळे तिने रसिकांची मनं जिंकली होती. मात्र या एका व्हिडीओमुळे माधवीबाबत रसिकांच्या मनात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.