Join us
Daily Top 2Weekly Top 5

५.५ कोटींच्या चित्रपट वित्तपुरवठा करारातील थकबाकी, अक्षय बर्दापूरकर यांच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई

By संजय घावरे | Updated: April 12, 2025 08:30 IST

बंगळूरूतील व्हर्से इनोव्हेशन्स प्रा. लि.ने दाखल केलेल्या अर्जात आर्थिक थकबाकी आणि करारातील अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 

मराठीतल पहिले ओटीटी प्लॅटफॅार्म म्हणून नावारूपाला आलेल्या प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या विरोधात इन्सॅाल्व्हेन्सी अँड बँक्रप्सी २०१६च्या कलम ९५ (१) अंतर्गत वैयक्तिक दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. बंगळूरूतील व्हर्से इनोव्हेशन्स प्रा. लि.ने दाखल केलेल्या अर्जात आर्थिक थकबाकी आणि करारातील अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 

डेलीहंट आणि जोश या प्लॅटफॅार्म्सची मूळ कंपनी असलेल्या व्हर्से इनोव्हेशन्स प्रा.लि.ने ३० सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या करारानुसार ‘राव साहेब’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी ५.५ कोटी रुपयांचा निधी प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि.ला दिला होता. प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांनी संपूर्ण रकमेवर हमी दिली होती. या कारणामुळे कंपनीच्या थकबाकीची जबाबदारी वैयक्तिकरीत्या बर्दापूरकरांवर येते असे व्हर्से कंपनीचे म्हणणे आहे. प्लॅनेट मराठीकडून कराराची अंमलबजावणी न झाल्याने व्हर्से इनोव्हेशन्सने वैयक्तिक हमी लागू करत संपूर्ण थकबाकीबाबत बर्दापूरकर यांच्यावर वैयक्तिकदृष्ट्या जबाबदारी ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर आयबीसी कलम ९५(१) अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. ही वैयक्तिक कारवाई प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीविरोधात सुरू असलेल्या कॉर्पोरेट दिवाळखोरी कारवाईव्यतिरिक्त स्वतंत्रपणे केली गेली आहे. 

याबाबत 'लोकमत'शी बोलताना अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, "'राव साहेब' हा चित्रपट तयार आहे. तो प्रदर्शित करून या समस्येचे निवारण करणार आहे. 'राव साहेब' हा चित्रपट तयार करून तो प्रदर्शित झाल्यावर त्यांचे पैसे देणे इतकाच मुद्दा आहे. पैसे देणे थोडे पुढे-मागे झाल्याने त्यांनी इन्सॅाल्व्हेन्सी दाखल केली आहे. चित्रपट तयार असून, सेन्सॅार प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जून-जुलैमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हे प्रकरण निकालात निघेल असेही ते म्हणाले. निखिल महाजन यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला आहे".

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी