वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. अभिनेत्री वांद्रे येथील कलानगरमध्ये राहत होत्या. जिथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) यांचे निवासस्थान होते. त्यांच्या शेजारी राहण्याचा अनुभव आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींना वर्षा उसगावकर यांनी उजाळा दिला.
वर्षा उसगावकर यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ''स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं घर शेजारी होतं. त्यामुळे मला २४ तास छान पोलीस प्रोटेक्शन असायचं. कलानगरमध्ये जाताना मला कधीच भीती वाटली नाही. रात्रीचे दोन तीन चार वाजू देत तिथे पोलीस प्रोटेक्शन असायचं. मला बोलवायचे ते घरी आणि छान गोष्टी सांगायचे. त्यांचे बापरे कितीतरी जोक्स सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप खेळकर होता. ते खूप मार्मिक बोलायचे आणि मला म्हणायचे, काय गं गोव्याची मुलगी, कसं काय गोव्यावरनं इथं आलीस आणि गोव्याची मुलगी ये गं इकडे. दामूकडे राहतेस तू असं ते बोलत राहायचे. मग माझी आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी आम्हाला खूप जोक्स वगैरे सांगितले. मग ते म्हणायचे की मी बिअर पितो दुपारी पण ही कॅलरीशिवाय बिअर आहे वगैरे मी म्हटलं बापरे हे सांगून बिअर पितात सगळ्यांना म्हणजे असं म्हणजे इतकं गमतीशीर त्यांचा स्वभाव. मग मिथुनला फोन लावणार ह्याला फोन लावणार आमच्या समोर आणि मग त्यांच्याशी आमचं बोलणं करून देणार असा त्यांचा खूप छान स्वभाव होता. ते खूप मार्मिक बोलायचे.''
''मला आवडायचा त्यांचा स्वभाव आणि मला असं वाटायचं बापरे ज्यांचं लिहून येतं एवढं ते बाळासाहेब ठाकरे शेजारी राहतात आणि त्यांचं मला दर्शन होतंय. असं मला त्या वेळेला वाटायचं आणि कारण खूप लिहून यायचं ना त्यांच्याबद्दल. म्हणजे महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं समीकरण होतं ते आणि एवढा मोठा माणसाचं दर्शन मला नेहमी व्हायचं म्हणजे मी किती भाग्यवान आहे, असं मला वाटायचं'', असे वर्षा उसगावकर यांनी या मुलाखतीत सांगितले.