पहलगाम हल्ला झाल्यानंतर (pahalgam attack) अभिनेता अतुल कुलकर्णी (atul kulkarni) आज काश्मिरला आले. काश्मीर येऊन अतुल कुलकर्णींनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. याशिवाय 'जास्तीत जास्त लोकांनी पहलगाम, काश्मीरला यावं', असं आवाहन त्यांनी केलंय. BBC ला दिलेल्या मुलाखतीत अतुल म्हणाले की, "मी आता जातोय पहलगामला. मी मुंबईवरुन आज सकाळी श्रीनगरला आलो. आता थांबत थांबत पुढे जातोय. जी घटना झाली ती अत्यंत दुःखद आहे. यासाठी आपण काय करु शकतो याचा मी विचार करत होतो."
"आपण फक्त सोशल मीडियावर याविषयी लिहितो. कुठेतरी काहीतरी बोलतो. पण यासाठी मी काय कृती करु शकतो. माझ्या वाचण्यात आलं की इथे येण्यासाठीचं ९० % बूकींग रद्द झालं. सध्या हा पर्यटनाचा चांगला काळ आहे. काश्मीरमधील जे लोक आहेत त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे. पर्यटनाचं फक्त पैशांपुरतं महत्व नाही. पर्यटनात लोक एकमेकांशी जोडले जातात. "
"खूप मोठ्या संख्येने लोक इथे येत होते. अचानक हे सर्व थांबलं तर... काश्मीरचा जो इतरांसोबत संबंध निर्माण होतोय तो थांबता कामा नये. त्यामुळे मी कालच हा निर्णय घेतला की, मला इथे यायचंय. लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे की, जर आपल्याला दहशतवाद्यांना जिंकू द्यायचं नसेल तर शासन - प्रशासनात अनेक उपाय असतील. पण दहशतवाद्यांनी आपल्याला जो मेसेज दिलाय की, इथे येऊ नका. तर असं नाही. आम्ही तर येणार. काश्मीर आमचं आहे. मोठ्या संख्येने इथे येणार."
"माझी लोकांना हीच विनंती आहे की, तुमचं बूकींग रद्द करु नका. इथे सध्या सुरक्षित आहे. खूप लोक इथे आले आहेत. जर तुम्ही कुठे दुसरीकडे जायचा प्लान बनवला असेल तर तो रद्द करुन इथे काश्मीरला या. काश्मिरी लोकांवर प्रेम करणं आवश्यक आहे. इथे आनंद आणि प्रेम आणणं आवश्यक आहे."
'इथे येण्यापूर्वी भीती नाही वाटली का?' असं विचारताच अतुल म्हणाले की, "जी घटना घडली ती दुर्दैवी होती. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. सध्या आपल्या मनात जी भिती आहे ती बाहेर काढून इथे येणं आवश्यक आहे." शेवटी अतुलने फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "हिंदोस्तां की ये जागीर है, के डर से हिम्मत भारी है, हिंदोस्तां की ये जागीर है, के नफ़रत प्यार से हारी है, चलिए जी कश्मीर चलें सिंधु, झेलम किनार चलें."