Join us

आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."

By कोमल खांबे | Updated: April 26, 2025 11:51 IST

"सोयराबाई परपुरुषांसमोर पान खातील का?", 'छावा'बाबत आस्ताद काळेचं स्पष्ट मत

विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला. 'छावा'मध्ये अनेक मराठी कलाकार झळकले. यात अभिनेता आस्ताद काळेदेखील दिसला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच आस्तादने त्याच्या सोशल मीडियावरुन छावा सिनेमाबाबत काही पोस्ट केल्या होत्या. आणि काही वेळाने त्या डिलीटही केल्या. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

आस्तादने नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सिनेमात चुकीचा इतिहास दाखवल्याचं म्हटलं आहे. तसंच 'छावा'मधील काही सीन्सवरही त्याने आक्षेप नोंदवला आहे.

राज्याभिषेक आधी झाला, मग बुऱ्हाणपूरची लूट

"विकी कौशलने खूप कष्ट घेतलेत. खूप अप्रतिम काम केलंय. मी हे सांगू शकतो कारण काही प्रसंगांमध्ये मी तिथे होतो. दुसरी गोष्ट सेट फार अप्रितम बांधला होता. फायटिंग सिक्वेन्स फार छान डिझाईन केले होते आणि ते चांगल्यापद्धतीने दाखवलेही गेले. पण, सेट आणि अॅक्शन म्हणजे फिल्म होत नाही. छावा सिनेमात सुरुवातीला बुऱ्हाणपुराची लूट दाखवण्यात आली आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे. पण, या दोन्ही गोष्टी उलट घडल्या होत्या. आधी राज्याभिषेक झाला आणि मग बुऱ्हाणपूरची लूट दाखवली. १४,१४,१६ जानेवारी १६८१ या काळात राज्याभिषेक झाला. आणि ३१ जानेवारीला बुऱ्हाणपूरची लूट झाली. पण, यावर जाऊ द्या एवढं काय, असंच जर तुम्हाला म्हणायचं असेल. तर मग सगळ्याच बाबतीत हेच लागू होतं ना...तुम्ही इतिहासाची प्रतारणा का करता? संभाजी महाराजांच्या बाबतीत अनेक इतिहासकारांनी वेगवेगळं लिहिलं आहे. पण, या तारखा सगळीकडे सेमच आहेत". 

'छावा' दोन भागांत का केला नाही?

असं म्हटलं जातं थोरल्या महाराजांच्या निधनापासून ते संभाजी महाराजांच्या निधनापर्यंत ९ ते १० वर्षांच्या काळात स्वराज्याचं सैन्य तिप्पट झालं होतं. संभाजी महाराजांनी ८-१० भाषा येत होत्या. शेतीमध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवले. एक व्यक्तिमत्त्व म्हणून संभाजी महाराज दाखवावेसे का नाही वाटत? ठिक आहे हे तुम्हाला दाखवायचं नसेल. पण, किमान इतिहासाशी तरी प्रामाणिक राहा. महाराणी येसूबाईंच्या नावाचा शिक्का होता. ही इतकी क्रांतिकारी गोष्ट तुम्हाला दाखवाविशी वाटली नाही. तुमच्याकडे आर्थिक बळ आहे. तांत्रिक बाजू अत्यंत बळकट आहे. तुमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मोठे मोठे स्टार्स काम करायला तयार होतात. तुम्ही ९ वर्षाच्या या काळात दोन सिनेमे करायचा का निर्णय घेतला नाही? बाहुबली सारखी काल्पनिक गोष्ट त्यांना दोन भागांत सांगाविशी वाटली. तुम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास दोन भागांमध्ये सांगायचे कष्ट नाही का घ्यायचे? कष्ट घ्या थोडं खोलात शीरा...

'त्या' सीनवर आक्षेप

राज्याभिषेकाला जाताना महाराज इंग्रज अधिकाऱ्याशी एक वाक्य बोलतात ते आजचं इंग्रजी आहे. ५० वर्षांपूर्वींचं इंग्रजी वेगळं होतं. आजचं इंग्रजी वेगळं आहे. दोन वाक्यच घ्या पण ते तरी नीट करा. खूप वरवरचा खोलात न जाता केलेला हा प्रयत्न आहे आणि तो मला आवडलेला नाही. आजच्या काळात सुद्धा कुठल्याही चांगल्या घरातील स्त्री ही परपुरुष बाहेर असताना पटकन बाहेर येत नाही. ४०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची पट्टराणी असलेल्या सोयराबाई राणी सरकार भर दरबारात चार परपुरुषांसमोर पान लावून खातात. हे कसं शक्य आहे? ट्रोलिंग होणार हे मला माहीत होतं. पण, हे जे ट्रोल करतात. त्यांना या गोष्टी खटकत नाहीत का? केवळ सोयराबाईंमुळे संभाजी महाराजांना त्रास झाला म्हणून हे पण चालतं का तुम्हाला? पण, मला नाही चालणार. काही झाल्या तरी त्या स्वराज्याच्या पट्टराणी होत्या. त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागली. तुम्ही पुन्हा तेच केलंत...संभाजीमहाराजांना एका इमेजमध्ये बसवलंत आणि ते दाखवलंत. या सिनेमासाठी ९० कोटींचं बजेट होतं. आणि तुम्ही ८०० कोटी मिळवले. तुमच्याकडे सगळं तंत्रज्ञान आहे. ते त्यांनी चांगलंच केलं आहे. पण, याशिवाय तुमच्याकडे हक्काचं ऑडिशन आहे. मग करा ना दोन भागांत सिनेमा. घाई करायची काय गरज होती? 

"दुर्देवाने आजपर्यंत संभाजी महाराजांवर तेवढ्या कलाकृती निर्माण झाल्या नाहीत. जेवढ्या शिवाजी महाराजांवर झाल्या. दिग्पाल लांजेकरने जेव्हा शिवराजअष्टक जाहीर केलं. तेव्हा त्याने सांगितलं होतं की रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली तेव्हापासून ते महाराजांना देवाज्ञा झाली तेव्हापर्यंतच्या ३५ वर्षातील काही महत्त्वाचे प्रसंग आपण निवडुया. यातच्या ५ फिल्म्स झालेल्या आहेत. या प्रत्येक सिनेमात महाराजांचा वेगळा पैलू दिसतो. या पाचही सिनेमांचं मिळून जेवढं बजेट आहे. त्यापेक्षा जास्त या सिनेमाचं बजेट होतं. असं सगळं असताना तुम्ही असं का करावं? आणि शेवटी माझ्या राजाची गोष्ट सांगताय तर ती नीटच सांगितली पाहिजे. नाहीतर सांगू नका. कोणी तुमच्या मानगुटीवर येऊन बसलेलं नाही", असंही आस्ताद म्हणाला. 

टॅग्स :'छावा' चित्रपटअस्ताद काळेविकी कौशल