मराठी अभिनेता आस्ताद काळेने त्याच्या सोशल मीडियावर एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला होता. या गाडीचा नंबरही आस्तादने शेअर करत ती व्यक्ती कोण आहे याची माहिती मिळवण्यासाठी चाहत्यांकडे मदत मागितली होती. पण, आता मात्र त्या व्यक्तीशी बोलणं झाल्यानंतर आस्तादने आता तो व्हिडीओ डिलीट केला आहे.
आस्तादने आता त्याच्या अकाऊंटवरुन नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो म्हणतो, "नमस्कार, काल एका गाडीचा जो व्हिडीओ मी शेअर केला होता. त्या गाडीच्या नंबरवरुन त्या वाहनाची माहिती मिळवण्यासाठी मी मदत मागितली होती. तर मला त्या गाडीच्या मालकाचं नाव आणि त्याचा फोन नंबर पाठवण्यात आला. आताच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. वय वर्ष २५चा तो तरुण आहे. त्याची नवी कोरी गाडी आहे. आमच्या छान गप्पा झाल्या. त्याच्याही लक्षात आलं कुठे ही घटना घडली होती. त्याने माफी मागितली आणि त्याने यामागची कारणं सांगितली. त्याला एका दुसऱ्या गाडीने कट मारला होता त्या गाडीला त्याला गाठायचं होतं. त्याआधी बरंच काही घडलं होतं. त्याने माफी मागितली. हे प्रकरण आता निस्तरल्यामुळे काल टाकलेला व्हिडीओ मी डिलीट करत आहे. त्यावर कुठलीच चर्चा करण्याची आता आवश्यकता नाही. ज्यांनी मदत केली, सल्ले दिले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो, धन्यवाद".
डिलीट केलेल्या व्हिडीओत आस्तादने काय म्हटलं होतं?
"ही जी गाडी दिसतेय मारुती सुझुकी XL6 नंबर आहे MH48DD8980... हा एक्सप्रेस हायवेवर अतिशय रफ गाडी चालवत आहे. त्याच्या गाडीत एक भगवा झेंडा आहे. तो शिंदे सेनेचा आहे की शिवसेनेचा हे मला माहीत नाही. तेवढं नीट बघता आलं नाही. पण अतिशय मग्रुरीने त्याचं सगळं वर्तन रस्त्यावर चालू आहे. ही गाडी कोणाची आहे याची माहिती जर मिळाली तर कृपया मला कळवा. याने आता माझ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात डावीकडून कट मारलाच आहे. आणि त्यानंतर दोन गाड्यांनागी डेंजर पद्धतीने कट मारलाय. याची कोणाला माहिती असेल तर कृपा करुन कळवा". यासोबत गाडीत लावलेला झेंडा हा राजकीय पक्षाचा असल्याचंही तो म्हणाला होता. पण, आता त्याने हा व्हिडीओ डिलीट केला आहे.