Join us  

​अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की झळकणार वन्स मोअर चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 4:56 AM

मराठी अभिनेते महेश कोठारे, सचिन पिळगांवकर यांची दुसरी पिढी आपल्याला चित्रपटसृष्टीत पाहायला मिळत आहे. महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ, ...

मराठी अभिनेते महेश कोठारे, सचिन पिळगांवकर यांची दुसरी पिढी आपल्याला चित्रपटसृष्टीत पाहायला मिळत आहे. महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ, सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रेया यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले चांगले बस्तान बसवले आहे. त्याचसोबत निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय, विजय चव्हाण यांचा मुलगा वरद अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकत आहेत. आता त्यांच्यानंतर मराठीतील एका ज्येष्ठ संगीतकाराचा मुलगा चित्रपटसृष्टीत येण्यास सज्ज झाला आहे.संगीतकार अशोक पत्की यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेली सगळीच गाणी अतिशय प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी आभाळमाया, हॅलो इन्स्पेक्टर यांसारख्या मालिकांना दिलेले संगीतही खूप गाजले होते. आता त्यांचा मुलगा आशुतोष चित्रपटसृष्टीत येण्यास सज्ज झाला आहे. पण आशुतोष वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संगीतसृष्टीत आपले करियर करणार नाहीये तर तो एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वन्स मोअर या चित्रपटात तो झळकणार आहे.वन्स मोअर या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या चित्रपटात आशुतोषसोबत अभिनेत्री धनश्री पाटील झळकणार आहे. धनश्रीचादेखील हा पहिलाच चित्रपट आहे. याचसोबत रोहिणी हट्टंगडी, भारत गणेशपुरे, पोर्णिमा तळवळकर, नरेश बिडकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा श्वेता बिडकर यांची असून नरेश बिडकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईत झाला असून काही चित्रीकरण गोव्यात होणार आहे. विशेष म्हणजे शेफ विष्णू मनोहरदेखील एका विशेष भूमिकेत प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. आशुतोषने याआधी मेंहदीच्या पानावर, दुर्वा यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.