उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा 'एप्रिल मे ९९' (April May 99 Movie) सिनेमा येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक कलाकार समोर आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर (Ashutosh Govarikar) एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची उत्सुकता जास्त वाढली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये श्रीकांत खेडेकर आणि जाई खेडेकर दिसत आलेत. वडील मुलीच्या नात्यातील जिव्हाळा यात दिसतोय. जुन्या काळातील लँडलाईन फोनवरून होत असलेला त्यांचा हा संवाद एका गोड, भावनिक कथेची झलक देतो. ‘एप्रिल मे ९९’ ही कथा १९९९ सालातील पार्श्वभूमीवर आधारित असून, काळाच्या ओघात हरवलेल्या नात्यांच्या आणि आठवणींच्या गुंफणीतून प्रेक्षकांना एक भावनिक सफर घडवून आणणार आहे.
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. यात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात आणि मंथन काणेकर आणि साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.