अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनंतर यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - जीवनगौरव' पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. गेल्या १० मार्च रोजी भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या 'गेटवे ऑफ इंडिया' येथे पार पडलेल्या या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान झाला. या कार्यक्रमात अशोक सराफ यांनी सध्याच्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं. राजकारणातून काही ऑफर आल्या का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं.
लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांना 'सध्याच्या राजकारणावर तुमचं मत काय?' असं विचारलं. त्यावर ते म्हणाले, "मला राजकारणातलं काहीही कळत नाही. मी राजकारणात पडत नाही. मी कधी राजकारण केलेलं नाही". पुढे, 'तुम्हाला राजकारणातल्या ऑफर आल्या आहेत का?' असं विचारलं असता अशोक सराफ म्हणाले, "नाही बिलकूल नाही. नाही येत ते बरं आहे आणि आली तरी मी जाणार नाही. कारण आपलं काम नाही ते".
अशोक सराफ हे १९६९ पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. 'जानकी' या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी 'आयत्या घरात घरोबा', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'भूताचा भाऊ', 'धुमधडाका'सह ३०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली. हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला. 'सिंघम' मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय 'गुप्त', 'कोयला', 'येस बॉस', 'करण अर्जुन', 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
Web Summary : Actor Ashok Saraf received the 'Lokmat Maharashtrian of the Year' award and stated he stays away from politics. He affirmed that he has never received political offers and would decline them, as it is not his area of expertise.
Web Summary : अभिनेता अशोक सराफ को 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्कार मिला और उन्होंने कहा कि वह राजनीति से दूर रहते हैं। उन्होंने पुष्टि की कि उन्हें कभी राजनीतिक प्रस्ताव नहीं मिले और वह उन्हें अस्वीकार कर देंगे, क्योंकि यह उनकी विशेषज्ञता का क्षेत्र नहीं है।