Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीशिवाय प्रिया बापट आहे उद्योजिका, सख्ख्या बहिणीसोबत करतेय 'हा' व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 06:00 IST

Priya Bapat: प्रिया बापटने देखील स्वतःची एक उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे.

अभिनय क्षेत्रासोबतच विविध व्यवसाय क्षेत्रात उतरून अनेक कलाकार मंडळी उद्योजक बनले आहेत. साड्यांचे ब्रँड असो वा ज्वेलरी अशा विविध क्षेत्रात मराठी सृष्टीतील प्रसिद्ध नायिका आपले नशीब आजमावून स्थिरस्थावर झालेले दिसत आहेत. अशातच प्रिया बापटने देखील स्वतःची एक उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. प्रिया बापट हिने बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण करून मागे वळून कधी पाहिले नाही. मग अगदी दे धमाल सारखा बालकलाकरांचा कार्यक्रम असो वा सिटी ऑफ ड्रीम्स वेबसिरीज मधला गीतिका त्यागी सोबतचा किसिंग सिन यामुळे प्रिया बापट सतत चर्चेत राहिली होती. प्रियाची सख्खी बहिणीचादेखील मराठी सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. 

प्रिया बापटच्या सख्ख्या बहिणीचं नाव श्वेता बापट असून ती मराठी सिनेइंडस्ट्रीत सेलिब्रेटी स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर म्हणून ओळखली जाते. प्रिया आणि तिचा नवरा म्हणजेच उमेश बापटची देखील तीच स्टायलिस्ट आहे. प्रिया बापट शिवाय ती बऱ्याच सेलिब्रेटींसाठी स्टायलिस्ट म्हणून काम करते. यात श्रेया बुगडे, अशोक फळदेसाई, हृता दुर्गुळे यांचा समावेश आहे. काही व्यावसायिक जाहिराती तसेच मालिकांसाठी श्वेताने कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केले आहे. माझा होशील ना या लोकप्रिय मालिकेच्या टायटल सॉंगसाठी श्वेताने स्टायलिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 

अभिनयाच्या या प्रवासात प्रियाने आपली बहीण श्वेतासोबत मिळून ‘सावेंची’ या नावाने साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा ब्रँड सेलिब्रिटींची पसंती मिळवताना दिसत आहे. ‘सावेंची’ या ब्रँडच्या नावाने त्यांचे इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू केले आहे जिथे तुम्हाला त्यांच्या ब्रँडच्या साड्या पाहायला मिळतील.

विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या ब्रँडचे पहिले वहिले प्रदर्शन पुण्यातील मनोहर बँक्वेट या ठिकाणी भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. यावेळी स्वतः श्वेता बापट आणि प्रिया बापट यांनी हजेरी लावून आपल्या ग्राहकांशी संवाद साधला. या ब्रँडची त्यांनी अधिकृत वेबसाईट देखील सुरू केलेली आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदीला त्यांच्या ग्राहकांनी जास्त पसंती दर्शवलेली पाहायला मिळते आहे. 

टॅग्स :प्रिया बापट