कोकणातील गणेशोत्सव हा परंपरा आणि लोककलांनी परिपूर्ण असतो. गावागावांत ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक रितीरिवाज पाळत, ज्याप्रकारे बाप्पाचं आगमन होतं, त्याचप्रकारे विधिवत विसर्जनही केलं जातं. नेमकं हेच वैशिष्ट्य दाखवण्यासाठी लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारेनं कोकणातील विसर्जन सोहळ्याची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे.
अंशुमन याने यंदाचा गणेशोत्सव आपल्या कुटुंबासोबत गावातच साजरा केला. त्याचं गाव कोकणातील संगमेश्वरमध्ये तुरळ येथे आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी त्याची पत्नी पल्लवी यांनी एक खास व्हिडीओ शूट करून तो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डीजे किंवा बॉलीवूडची गाणी नाहीत, तर फक्त पारंपरिक भजन, गणपती बाप्पाच्या आरत्या आणि शांत वातावरणात पार पडणारा विसर्जन सोहळा दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करून कोकणातील या पारंपरिक विसर्जन सोहळ्याची प्रशंसा केली आहे.
अंशुमनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायच झाल्यास, कोणाचंही प्रबळ पाठबळ नसल्यानं मराठी इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करावा लागला होता. आज अंशुमन आघाडीचा विनोदी कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक लोकप्रिय सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'घरोघरी', 'कानामागून आली' या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तर 'संघर्ष', 'भरत आला परत', 'मिसळ पाव', 'सूर राहू दे', 'शिनमा', 'परतू', 'पोश्टर बॉईज', 'वेड लावी जिवा' या चित्रपटात त्याने काम केलं आहे. त्याचबरोबर 'मोर्चा' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं.