महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबर आणि ई-बाईक टॅक्सी सेवांमधील अमराठी व्यावसायिक वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. १ मे पासून ज्या चालकांना मराठी भाषा येणार नाही, त्यांचे परवाने रद्द केले जातील. या नव्या नियमानुसार, परिवहन विभागाकडून चालकांची मराठी भाषेची परीक्षा घेतली जाऊ शकते आणि त्यात अनुत्तीर्ण होणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाला रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला असून, ४ मे पासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. १५ लाख चालकांच्या रोजगारावर यामुळे गदा येईल, असा दावा संघटनांकडून केला जात आहे. यावर मराठी कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
मराठी अभिनेता अंशुमन विचारे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चालकांना खडेबोल सुनावले आहेत. अंशुमनने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, "मराठी मातीत कमवून माज करायचा नाही... मराठी सगळ्यात आधी." अंशुमनच्या या भूमिकेला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून, मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अंशुमन प्रमाणेच दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमेनेही संताप व्यक्त केला होता. "१५ लाख चालकांना मराठी नको असेल, तर त्यांनी जिथे जमणार आहात तिथून आपापल्या भाषेच्या राज्यात परत जावे! तिथे कमवा आणि खा, पण महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलाच," अशा शब्दांत हेमंतने आपली भूमिका मांडली होती. कलाकारांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे रिक्षा चालकांचे आंदोलन आणि मराठी भाषेचा सक्तीचा नियम यावरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
Web Summary : Maharashtra mandates Marathi for auto drivers; actor Anshuman slams objectors. Failure leads to license cancellation. Unions protest, citing job losses. Artists support rule, sparking debate.
Web Summary : महाराष्ट्र में ऑटो चालकों के लिए मराठी अनिवार्य; अभिनेता अंशुमन ने विरोधियों को फटकारा। विफलता से लाइसेंस रद्द हो सकता है। यूनियनों का विरोध, नौकरी छूटने का हवाला। कलाकारों का नियम का समर्थन, बहस छिड़ी।