अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आणि सिनेसृष्टीत स्थान निर्माण करणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा, नाटकांमध्ये काम करून अमृताने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी कलाविश्वातही आपली ओळख बनवली. तिला लहानपणापासूनच कलेची आवड होती. मात्र बालपणीच अमृता सुभाषला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याचा उल्लेख केला.
अमृताने नुकतीच एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने शाळेतला वर्णभेदाचा प्रसंग सांगितला. गोरी दिसत नाही म्हणून अमृता शाळेतील शिक्षकांनी डान्समध्ये भाग घेऊ दिला नव्हता. हे सांगताना ती म्हणाली, "माझ्या एका लहानपणीच्या बाईंनी मला सांगितलं होतं की सुंदर मुलींना मी डान्समध्ये घेणार आहे. तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की माझा डान्स बघा. तेव्हा त्या मला म्हणाल्या की नाही तू काही गोरी घारी नाहीस. त्यामुळे तू डान्स करू नकोस. मला त्या बाईंनी डान्समध्ये घेतलं नाही".
"तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण सावळे आहोत म्हणजे आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी करायला मिळणार नाहीत. त्या बाईंनी त्यांच्या नकळत हा विचार माझ्या मनात पेरला. पण, त्याला खतपाणी घालायचंय, त्याचं झाड उगवू द्यायचंय की ते मनावर घ्यायचं नाही, हे माझ्या हातात आहे. मी त्या गोष्टीला असंच जावू देऊ शकते. आणि म्हणू शकते की नाही मला डान्स करायला आवडतो आणि मला संधी मिळू शकते. हे दोन्ही रस्ते आपल्यासमोर दर दिवशी उभे असतात. आणि आपल्याला त्यातली निवड करायची असते. ते स्वातंत्र्यही आपल्याकडे असतं पण शेवटी आपण माणूस आहोत. त्यामुळे कधी कधी आपण वीक होऊ शकतो", असंही अमृता पुढे म्हणाली.