अमृता खानविलकर झळकणार वेबसिरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 16:18 IST
वाजले की बारा फेम अमृता खानविलकर पहिल्यांदाच वेबसिरिजमध्ये झळकणार आहे. अमृताने नच बलिये या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवले होते. या ...
अमृता खानविलकर झळकणार वेबसिरिजमध्ये
वाजले की बारा फेम अमृता खानविलकर पहिल्यांदाच वेबसिरिजमध्ये झळकणार आहे. अमृताने नच बलिये या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवले होते. या कार्यक्रमात ती पती हिमांशू मल्होत्रासोबत झळकली होती. सध्या ती मॅड 2 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. आता ती प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे.वेबसिरिजचे सध्या चांगलेच फॅड आलेले आहे. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेतेदेखील वेबसिरिजकडे वळले आहेत. त्याचसोबत मराठीतील अनेक कलाकारदेखील वेबसिरिजमध्ये झळकताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. आता अमृता खानविलकर एका वेबसिरिजमध्ये झळकणार असून ही वेबसिरिज सायको-थ्रिलर असणार आहे. या वेबसिरिजची निर्मिती एकांत बबानी करणार आहेत. या वेबसिरिजचे नाव बाके आणि बुरी असे असून त्याच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील झाली आहे. अमृताने मोठ्या पडद्यासोबत छोट्या पडद्यावरही काम केले आहे. पण कोणत्याही वेबसिरिजमध्ये काम करण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या वेबसिरिजमध्ये काम करण्यासाठी ती सध्या खूप उत्सुक आहे. ती सांगते, "कोणत्याही वेबसिरिजमध्ये काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. या वेबसिरिजसाठी मी सध्या चित्रीकरण करत असून माझा चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला आहे." या वेबसिरिजचे चित्रीकरण सध्या सुरू असून अमृता यामध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ही वेबसिरिज काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. अमृताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून तिने अनेक रिअॅलिटी शोमध्यदेखील भाग घेतलेला आहे. सिनेस्टार की खोज या रिअॅलिटी शोद्वारे अमृता अभिनयक्षेत्रात आली. ती अनिल कपूर यांच्यासोबत 24 या मालिकेतही झळकली होती. तसेच तिने अनेक हिंदी चित्रपटातही काम केले आहे.