Join us

​या गोष्टीसाठी केले जातेय अमेय वाघचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 13:27 IST

अमेय वाघचे एका गोष्टीसाठी सध्या चांगलेच कौतुक होत आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील एक जवळची व्यक्ती नुकतीच गमावली आहे. पण ...

अमेय वाघचे एका गोष्टीसाठी सध्या चांगलेच कौतुक होत आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील एक जवळची व्यक्ती नुकतीच गमावली आहे. पण तरीही कामाला प्राधान्य देत लगेचच तो त्याच्या एका नाटकाच्या प्रयोगाला हजर झाला. अमेयच्या कामाबद्दलच्या असलेल्या या समर्पणाचे कौतुक अमेयचा खास मित्र आणि अभिनेता-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने केले आहे. निपुणने त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये निपुणने लिहिले आहे की, कामाला प्राधान्य देणारे आणि त्याबद्दल प्रामाणिक असलेले लोक फार कमी बघायला मिळतात. अशा लोकांच्या संगतीत राहायला बरं वाटतं आणि त्यांचा अभिमानही वाटतो. काल रात्री उशिरा आजोबांचे निधन होऊन, आज पहाटे आणि दिवसा सगळे क्रियाकर्म आटपून दुपारी दुसऱ्या गावी जाऊन 'अमर फोटो स्टुडिओ'चा प्रयोग करणाऱ्या अमेय वाघला सलाम. अमेय वाघच्या आजोबांचे नुकतेच अचानक निधन झाले आणि त्यानंतरही कामाला प्राधान्य देत अमेय नाटकाच्या प्रयोगासाठी अंत्यविधीनंतर लगेचच हजर झाला. त्याच्यामुळे प्रयोग रद्द होऊ नये म्हणून आपले दुःख बाजूला ठेवून तो नाटकाच्या प्रयोगाला हजर झाला.अमेय वाघ सध्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याच्या अभिनयावर सगळेच फिदा आहेत. त्याने आजवर फास्टर फेणे, मुरंबा, शटर, पोपट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अमेय वाघचा सिनेसृष्टीपर्यंतचा प्रवास अतिशय इंटरेस्टिंग आहे. अमेयने आपल्या करिअरची सुरुवात नाटकापासून केली. बालनाट्यापासून सुरुवात करता करता अमेय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवू लागला आणि पुढे त्याने व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. पुढे अभिनयाच्या जोरावर मालिका आणि सिनेमे त्याला मिळत गेले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने अमेयला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या मालिकेमुळे तो एक चांगला नायक असल्याची सगळ्यांना खात्री पटली आणि मराठी चित्रपटसृष्टीची दारे त्याच्यासाठी उघडली.अमेय वाघने फास्टर फेणे या त्याच्या पहिल्याच चित्रपटात सिक्सर मारला आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटानंतर प्रदर्शित झालेल्या मुरांबा या चित्रपटाचे देखील प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. Also Read : आगामी चित्रपटासाठी अमेय वाघ घेतोय 'या' गोष्टीवर मेहनत