१९९१ साली माहेरची साडी (Maherchi Saadi) हा सिनेमा रिलीज झाला होता आणि हा चित्रपट त्याकाळी ब्लॉकबस्टर ठरला होता. त्या काळात पहिल्या तीन महिन्यात या सिनेमाने १२ कोटींची कमाई केली होती, ज्यामुळे तो त्याकाळातील सर्वाधीक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला होता. या चित्रपटातून अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनाही खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर त्यांचाही भाव वधारला होता. पण तुम्हाला माहित्येय का, या सिनेमासाठी अलक कुबल यांना पहिली पसंती नव्हती. बॉलिवूडच्या एका नायिकेला माहेरची साडीची ऑफर देण्यात आली होती. पण तिने नाकारली. त्यानंतर चित्रपटात अलका कुबल यांची वर्णी लागली.
अलका कुबल यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, माहेरची साडी हा चित्रपट कमी मानधनमुळे नाकारला होता. तसेच त्यांच्या आधी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनला निर्माते-दिग्दर्शकांची पहिली पसंती असल्याचेही सांगितले. अलका कुबल यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माहेरची साडी सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते विजय कोंडके यांना भाग्यश्री पटवर्धनला कास्ट करायचे होते. ते सहा महिने तिच्या वडिलांसोबत मीटिंग करत होते. पण त्यावेळी ती हिंदी सिनेइंडस्ट्रीत खूप लोकप्रिय झाली होती की तिला कदाचित त्यावेळी मी मराठी चित्रपट आता का करावा असे वाटले असेल आणि तिने या सिनेमाला नाही म्हटलं. मग ते नवीन अभिनेत्रीच्या शोधात होते.
या व्यक्तीमुळे अभिनेत्रीने स्वीकारला सिनेमा
खरेतर विजय कोंडके यांना माहेरची साडी सिनेमासाठी अलका कुबल नको हव्या होत्या. कारण त्यांचे जवळपास २५-३० सिनेमे रिलीज झाले होते. त्यांची एक इमेज बनली होती. पण पितांबर काळे आणि एन एस वैद्य विजय कोंडके यांना सारखे सांगत होते की तुम्ही या भूमिकेसाठी अलकालाच घ्या. एकदा तिला भेटा तुम्ही. मग ते विजय कोंडके यांच्या घरी शिवाजी पार्कला गेले. त्यांना भेटले, असे अभिनेत्रीने सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, कथानक आणि भूमिका आवडण्यासारखीच होती आणि त्यावेळी कामासाठी चॉइस नव्हता. दादा कोंडकेंचा आशीर्वाद होता त्या चित्रपटाला त्यामुळे नाही बोलूच शकत नव्हते. पण त्या सिनेमाचं मानधन खूप कमी होते. त्यामुळे मी नाही म्हटलं आणि बाहेर आले. मग पितांबर काळे माझ्या मागून आले आणि म्हणाले नाही अलका, तू हा चित्रपट माझ्यासाठी कर. या चित्रपटानंतर तुझं आयुष्य बदलेल. शेवटी मी त्यांच्या शब्दाखातर आत गेले आणि सिनेमा साइन केला. त्यांचे ते शब्द खरे ठरले.