आईवडिलांचा हात पकडून अभिनयात आलेले अनेक स्टारकिड्स आहेत. हिंदीप्रमाणेच मराठीतही काही स्टारकिड आईवडिलांप्रमाणेच अभिनयाची वाट धरतात. पण, सुप्रसिद्ध अभिनेत्री असूनही अलका कुबल यांच्या दोन्ही लेकींनी मात्र सिनेसृष्टीकडे पाठ फिरवत करियरसाठी वेगळी क्षेत्र निवडली. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल यांनी भाष्य केलं.
अलका कुबल यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "मी पडद्यावर रडले तरी खूप स्ट्राँग आहे. माझी मोठी मुलगी पायलट आहे. आणि दुसरी अॅनेस्थेशियामध्ये एमडी करत आहे. दोघी मुली वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. आम्ही त्यांना सपोर्ट केला. माझा जावईही पायलट आहे. त्या दोघींनीही आवडीने त्यांची क्षेत्र निवडली. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी माझा त्यांना कधीच विरोध नव्हता. आणि माझा त्यांना फार पाठिंबाही नव्हता. कारण, हे अळवावरचं पाणी आहे, असं मला वाटायचं. या क्षेत्रात लक फॅक्टर लागतो. सिनेमा चालला तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते. नाहीतर तुम्हाला शेवटपर्यंत स्ट्रगलच आहे. मग त्यामानाने पैसाही मिळत नाही आणि तसं नावही होत नाही. फक्त ओळख निर्माण होते. पण, मार्केट होणं फार कठीण आहे. कारण, सध्याच्या काळात स्पर्धा खूप आहे".
अलका कुबल या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. अभिनयाने आणि विशिष्ट भूमिका साकारून त्यांनी एक काळ गाजवला. माहेरची साडी, लेक चालली सासरला, कमाल माझ्या बायकोची, देवकी, वाट पाहते पुनवेची, अग्नीपरिक्षा हे त्यांचे गाजलेले चित्रपट. काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. आता वजनदार या नाटकातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.