अलका कुबल (Alka Kubal) गेल्या ४० वर्षांपासून मराठी मनोरंजनविश्वात काम करत आहेत. वयाच्या १७ व्या वर्षापासूनच त्यांनी काम करायला सुरुवात केली. 'नटसम्राट'मध्ये त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. 'माहेरची साडी' मुळे अलका या मराठीतल्या सुपरस्टार झाल्या होत्या. त्यांच्याकडे सिनेमांची रांग लागली होती. काही वर्षांनी त्यांचा कार अपघात झाला. त्यांची सर्जरी करावी लागली आणि जवळपास सहा महिने त्या अंथरुणातच होत्या. तेव्हा इंडस्ट्रीकडून कसा कटू अनुभव आला हे त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल म्हणाल्या, "माझा अपघात झाला होता. मी सहा महिने बेडवर होते. माझं वजन ११० किलो झालं होतं. सर्जरी झाली. डॉक्टरांनी मला पुन्हा उभं केलं. त्यावेळी माझ्या हातात एकामागोमाग एक सहा सिनेमे होते. मी त्यांच्याकडे चेकअपला गेले. त्यांना म्हटलं की मी रात्रीच्या गाडीने निघणार आहे. तीन चार महिने मुंबई येऊ शकणार नाही. पण डॉक्टरांनी मला सगळं रद्द करायला लावलं. कारण मला सर्जरीचीच आवश्यकता होती. तेव्हा मला वाटलं की काही निर्माते थांबतील. पण तसं झालं नाही. बऱ्याच जणांना रागही आला की असं कसं शूट रद्द केलं. आमचं शूट करुन मग सर्जरी करायची ना असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना माझ्या परिस्थितीचं गांभीर्य माहित नव्हतं. तर असाही अनुभव आला. एक दोन निर्मात्यांनी तर माझ्याकडून साइनिंग अमाऊंटही परत नेली. आता मी लगेच उभी राहू शकणार नाही असं त्यांना वाटलं. अलका कुबलची रंजना देशमुख झाली असंही एकजण म्हणाले. इंडस्ट्रीत माझ्याबद्दल अशीच माहिती पसरली. पण इतकं काही नव्हतं मी फक्त काही महिने बेड रेस्टवर होते. आजही मला खाली बसता येत नाही एवढंच. असे अनुभव आले."
"मला असं वाटतं इंडस्ट्री तशीच असते. चांगलं असेल त्याच्या मागे असते. करिअरच्या सुरुवातीला तर माझ्याबद्दल खूप टीका व्हायची. मी टिपीकल भूमिका करायचे, रडूबाईच्या भूमिका असायच्या, माझ्या रडण्यावर अजूनही मीम्स येतात. पण मी ते खेळाडू वृत्तीने घेते. आजकालची लहान मुलं मला ओळखतात हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे."