Join us  

अभिनेता अक्षय वाघमारे दिसणार सत्तेच्या 'खुर्ची'त, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 12:35 PM

'युथ', 'होऊ दे जरासा उशीर', 'दोस्तीगिरी' यासारख्या चित्रपटातून तर 'ती फुलराणी' या मालिकेतुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता अक्षय वाघमारे.

'युथ', 'होऊ दे जरासा उशीर', 'दोस्तीगिरी' यासारख्या चित्रपटातून तर 'ती फुलराणी' या मालिकेतुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता अक्षय वाघमारे. लवकरच हा अभिनेता एका नव्या कोऱ्या 'खुर्ची' या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे. सम्राट नावाची व्यक्तिरेखा तो या चित्रपटात साकारत आहे.

खेड्यात राहणारा आणि गावात नावलौकिक असलेल्या २५ वर्षाच्या स्वतःच्या धुंदीत राहणाऱ्या मात्र गावावर स्वतःचे वर्चस्व असणाऱ्या सम्राट या मुलाचे पात्र तो या चित्रपटात साकारत आहे.  या चित्रपटातील भूमिकेबद्दल विचारले असता अक्षय म्हणाला, 'राजकारण हा विषय माझ्याही आवडीचा आहे त्यामुळे चित्रपटात भूमिका साकारताना मी स्वतः त्या भूमिकेशी एक झालोय. एका वेगळ्या धाटणीची अशी ही भूमिका मी पहिल्यांदाच साकारतोय त्यामुळे मी ही स्वतःला या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहायला आवर्जून उत्सुक आहे. माझ्या वैयक्तिक जीवनातही राजकारण हा विषय अगदी माझ्या जवळचा आहे त्यामुळे त्याचा माझ्यावर होणारा प्रभाव या चित्रपटातुन कुठेतरी दिसेल असे मला वाटते.

गावाकडील राजकारणाचे डावपेच एकंदरीत या चित्रपटात प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहेत. राजकारण हा विषय हातळतानाचा मी तुम्हाला नक्कीच भावेल याची मला खात्री आहे'. अक्षयसह या चित्रपटात अभिनेता आर्यन संतोष हगवणे, अभिनेत्री श्रेया पसलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही  चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.

खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण दर्शविणारा हा सिनेमा आहे. गावागावात खुर्चीसाठीच्या राजकारणात लहान मुलांच्या मनावर बिंबत जाणारे राजकारणाचे डावपेच ‘खुर्ची’ सिनेमातून दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडले आहे. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे 

टॅग्स :सेलिब्रिटी