Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आई-बाबा दोघेही गेले...", अजिंक्य देवने भावूक होत शेअर केली पोस्ट, म्हणाला-राहिल्या फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:57 IST

सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव आपल्याला अनेकवेळा भावूक झालेला दिसला.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे गुरुवारी(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने आजारी होत्या. मुलगा अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांनी दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्याशी विवाह केला होता. अभिनय देव व अजिंक्य देव ही त्यांची दोन्ही मुले मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव आपल्याला अनेकवेळा भावूक झालेला दिसला.

सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय. अजिंक्यने सोशल मीडियालवर रमेश देव आणि सीमा देव यांचं काही न पाहिलेले फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ''आई-बाबा दोघे ही गेले राहिल्या फक्‍त आठवणी… सुंदर गोड आठवणी.'' त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. एका यूजर्सने लिहिले, ''एकवार पंखा वरूनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.. हे गाणे नकळत त्या दिवशी आठवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूज बघितली तर सीमा ताई गेल्या होत्या, माझ्या आई वडिलांनी मला त्यांची सर्व गाणी परिचित करवून दिली.. सुंदर आयुष्य जगलेत दोघं ही, अभिनय क्षेत्रातील एक आदर्श जोडी..❤️ ईश्वर तुमच्या परिवाराला हे दुःख झेलण्याचं बळ देवो.'' आणखी एकाने लिहिले, ''आईवडिलांचं छत्र हरपणं अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे. "येणार तो जाणार" हे या जगातलं एक कटू सत्य आहे..तुमच्या सर्वांच्या दुःखात मनापासून सहभागी आहोत. शक्य असूनही माझ्या अत्यंत आवडत्या या जोडीला कधीच भेटायचा योग आला नाहा याची खंत नेहमीच राहील. ईश्वर त्या दोघांच्या पुण्यात्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना.''

अजिंक्य देव यांचे वडील आणि दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं फेब्रुवारी २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यानंतर आता दीड वर्षांनी सीमा देव यादेखील स्वर्गवासी झाल्या.

टॅग्स :अजिंक्य देव