Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केल्यानंतर... आता पार्थ घेणार ‘फिरकी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 10:41 IST

'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमात बालवयातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालनारा पार्थ भालेराव बऱ्याच दिवसांनी ...

'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमात बालवयातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालनारा पार्थ भालेराव बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा एका संवेदनशील भूमिकेत दिसणार आहे.अल्पावधित लोकप्रिय झालेल्या पार्थने 'फिरकी' या आगामी मराठी सिनेमात एका निरागस मुलांची व्यक्तिरेखा साकारली आहे. स्पॅाटलाईट प्रोडक्शनच्या ‘फिरकी' या सिनेमात दिग्दर्शक सुनिकेत गांधी यांनी पतंग आणि फिरकीच्या माध्यमातून लहानगयांच्या भावविश्वात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. ९ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती मौलिक देसाई यांनी केली असून लेखन सुनिकेत गांधी यांचे आहे.प्रेक्षकांना  या सिनेमात 'भूतनाथ रिटर्न्स'मधे साकारलेल्या  अखरोटसारखा निरागस मुलगा भेटणार असल्याचे सांगत पार्थ म्हणाला की, आजवर मी बऱ्याच सिनेमात खोडकर मुलाची भूमिका साकारली आहे.'फिरकी'च्या निमित्ताने पुन्हा एकदा निरागस मुलाची भूमिका साकारताना एक वेगळेच समाधान लाभले.या सिनेमात मी साकारलेला गोविंद,टिचक्या आणि बंड्या या तीन मुलांची कथा पाहायला मिळेल. हा सिनेमा जरी मुलांच्या भावविश्वावर आधारित असला तरी आजवर कधीही प्रकाशझोतात न आलेले पैलू या सिनेमात सुनिकेत गांधी यांनी उलगडले आहेत. त्यामुळे हा सिनेमा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटेल असे मतही पार्थने व्यक्त केले.लहानपणी पतंग उडवताना झालेली टशन, मस्ती, गंमत आणि मित्रांची साथ या सगळ्यां गोष्टींची आठवण करून देत ‘फिरकी’ हा सिनेमा बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ठरणार आहे. आजवर बऱ्याच राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरविण्यात आलेल्या ‘फिरकी’ चित्रपटात पार्थसोबत पुष्कर लोणारकर,अभिषेक भाराटे,अथर्व उपासनी,अथर्व शाळीग्राम हे बालकलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.याशिवाय हृषिकेश जोशी यांनी या सिनेमात पार्थच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.यांच्या जोडीला ज्योती सुभाष, अश्विनी गिरी, किशोर चौघुले हे मराठीतील कलाकारही आहेत.पटकथा व संवाद सुनिकेत गांधी, आदित्य अलंकार, विशाल काकडे यांनी लिहिले आहेत.छायांकन धवल गणबोटे तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.अंबरीश देशपांडे, मैउद्दीन जमादार यांच्या लेखणीतून साकारलेल्या वेगवेगळ्या जॉंनरच्या तीन गीतांना भूषण चिटणीस,श्रीरंग धवले, सुनीत जाधव यांनी संगीत दिले आहे.