Join us

​दशमी क्रिएशन्सचा घंटानंतर मुरांबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 14:23 IST

दशमी क्रिएशन्सने दुर्वा, माझे मन तुझे झाले, बे दूणे दहा या मालिकांची निर्मिती केली होती. या मालिका प्रेक्षकांना चांगल्याच ...

दशमी क्रिएशन्सने दुर्वा, माझे मन तुझे झाले, बे दूणे दहा या मालिकांची निर्मिती केली होती. या मालिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या होत्या. दुर्वा या मालिकेची तर चांगलीच चर्चा झाली होती. या मालिकांच्या यशानंतर दशमी प्रोडक्शन चित्रपटांकडे वळले. त्यांनी घंटा या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेश काळे यांनी केले होते तर या चित्रपटाची कथा सुमित बोनकर आणि राहुल यशोद यांची होती. या चित्रपटात अमेय वाघ, आरोह वेलणकर आणि सक्षम कुलकर्णी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यांच्यासोबतच पुष्कर श्रोती, मुरली शर्मा, अनुजा साठे-गोखले, विजू खोटे यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. मुंबईत स्ट्रगल करत असेलेले तीन मित्र जगण्यासाठी काय काय उद्योग करतात हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. या चित्रपटानंतर आता दशमी प्रोडक्शनचा नवा चित्रपट येत आहे.या नव्या चित्रपटाची घोषणा नुकतीच फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवरून करण्यात आली आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव मुरांबा असे असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण नार्वेकर करत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक मुलगा आणि एका मुलीचे केवळ आपल्याला पाय दिसत असून त्या दोघांच्या हातात बियरचा ग्लास आहे. मुरांबा या चित्रपटाची घोषणा जरी प्रोडक्शन हाऊसकडून करण्यात आली असली तरी या चित्रपटात कोण कलाकार असणार याबाबत प्रोडक्शन टीमने मौन राखणेच पसंत केले आहे.