२७ वर्षांनंतर पुन्हा एकदा “षड्यंत्र”चा रहस्यमय थरार रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 17:14 IST
नाटककार सुरेश जयराम हयांचं १९९० साली गाजलेलं “षड्यंत्र” हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. प्रकाश बुद्धीसागर दिग्दर्शित, अभिनेते ...
२७ वर्षांनंतर पुन्हा एकदा “षड्यंत्र”चा रहस्यमय थरार रंगणार
नाटककार सुरेश जयराम हयांचं १९९० साली गाजलेलं “षड्यंत्र” हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. प्रकाश बुद्धीसागर दिग्दर्शित, अभिनेते चंदू पारखी, रमेश भाटकर, डॉ. गिरीश ओक, सविता प्रभूणे, प्रमोदीनी कदम, सुजाता कानगो, संदीप मेहता अभिनीत हया नाटकाने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळविली होती.जवळ जवळ २७ वर्षांनंतर हे नाटक पुन्हा त्याच जोमात व जोशात आताच्या दिग्गज दिग्दर्शक व कलावंतांसोबत रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.अभिनेता - दिग्दर्शक अरुण नलावडे या नाटकाचं दिग्दर्शन करीत असून अभिनेत्री सिया पाटील, सुचित जाधव, सुदेश म्हशीलकर आणि रमेश भाटकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत.सध्या या नाटकाची तालीम सध्या जोरात सुरू असून शुभारंभाचा प्रयोग दि.२१ एप्रिल रोजी उस्मानाबाद येथे होणार्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये होणार आहे.“षडयंत्र” हे नाटक एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात मिळकतीसाठी होणारा संघर्ष व त्यातून होणारे खून, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अशा गुंतागुंतीच्या कथानकावर आधारित आहे. या नाटकात अनेक धक्के आणि वळणे आहेत. त्यातून शिकार कोण आणि शिकारी कोण या संभ्रमात पडलेल्या प्रेक्षकांना खर्या अर्थाने एक रहस्यमय कलाकृती पाहिल्याचे समाधान देणारे नाटक आहे. गेली अनेक वर्ष आपल्या वेगवेगळ्या भूमिकेद्वारे रसिकांच्या मनावर राज्य करणारे अष्टपैलू अभिनेते अरुण नलावडे बर्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा या नाटकाद्वारे नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात उतरले आहेत. अभिनेता सुचित जाधव हया नाटकाद्वारे निर्मितीक्षेत्रात उतरले असून या नाटकात ते अभिनयही करणार आहेत. याआधी त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकातून तसेच अनेक मालिका व चित्रपटातून आपली छाप पाडली आहे. निर्माते मिलिंद मोरे प्रथमच हया नाटकाद्वारे निर्मितीक्षेत्रात उतरले असून सुचित जाधव यांच्यासोबत ही भव्य निर्मिती करीत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सिया पाटील हया नाटकाद्वारे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. अनेक मालिका आणि नाटकातून लेखन, अभिनय तसेच दिग्दर्शनक्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे सुदेश म्हशीलकर यांची हया नाटकात महत्वपूर्ण भुमिका आहे. लोकप्रिय अभिनेते रमेश भाटकर हया नाटकात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. योगायोग म्हणजे याआधीच्या “षडयंत्र” नाटकात त्यांनी तीच भुमिका केली होती. २७ वर्षांनंतर पुन्हा त्याच नाटकात तीच भुमिका करण्याचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. सोबत ऋषीकेश दळी, केवलानंद बर्वे, वासंतिका वाळके, प्रगती घाणेकर, माधुरी जोशी, देवेंद्र वाघमारे, यांच्याही यात भूमिका आहेत.