Join us

तब्बल २० वर्षांनंतर विजय पाटकरांचे मराठी रंगभूमीवर पुनरागमन, दिसणार ह्या नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 17:18 IST

मराठी आणि हिंदीत विनोदाचा बादशहा आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून नावाजले जाणारे, विजय पाटकर तब्बल २० वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर परतणार आहेत.

ठळक मुद्देविजय पाटकर तब्बल २० वर्षांनंतर परतणार मराठी रंगभूमीवर

मराठी आणि हिंदीत विनोदाचा बादशहा आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून नावाजले जाणारे, विजय पाटकर तब्बल २० वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर परतणार आहेत. अनेक सुप्रसिद्ध हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांतील विनोदी भूमिकांचा दीर्घ प्रवास केल्यानंतर, पाटकर आपल्याला 'दहा बाय दहा' या विनोदी नाटकामधून मनोरंजन करताना दिसून येणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच, म्हणजेच येत्या ६ एप्रिलला 'दहा बाय दहा'च्या शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे. अनिकेत पाटील दिग्दर्शित 'दहा बाय दहा' या धम्माल विनोदी नाटकात त्यांच्याबरोबर प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे हे कलाकारदेखील दिसणार आहेत. तसेच विदिशा म्हसकर हा नवा चेहरादेखील या चौकडीत आपल्याला दिसून येईल.  

स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित 'दहा बाय दहा' नाटकाचा दौरा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. या नाटकाचे लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केले आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट घेऊन येत असलेले हे नाटक, सामान्य माणसांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्यास प्रेरित करेल. 

'दहा बाय दहा'च्या घरात हसत खेळत जगणाऱ्या या कुटुंबाला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावे लागते, त्यानंतर त्यांच्यासोबत काय होतं? त्यातून ते कसा गोंधळ घालतात? हे सारे काही अगदी विनोदी ढंगात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. खास करून, विजय पाटकर यांचा कॉमेडी टच आणि त्यासोबतीला सुप्रिया पाठारे आणि प्रथमेश परब सारख्या विनोदवीरांची साथ लाभली असल्या कारणामुळे हे नाटक, ऐन गुढीपाडव्याला हास्याची नवी गुढी उभारण्यास सज्ज झाले आहे. 

टॅग्स :विजय पाटकरप्रथमेश परब