Join us

'उलाढाल'च्या शूटिंगवेळी मुंबईच्या मुकेश मिलमध्ये दिसलं डान्सरचं भूत, दिग्दर्शक म्हणाला- "ती मुलगी वॉशरुमला गेली तेव्हा..."

By कोमल खांबे | Updated: November 7, 2025 16:36 IST

हॉरर सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेले आदित्य सरपोतदार यांनाही सिनेमाचं शूटिंग करताना भीतीदायक अनुभव आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला. 

'थामा' या सिनेमामुळे आदित्य सरपोतदार चर्चेत आहेत. याआधीही त्यांनी 'मुंज्या', 'काकुडा', 'झोंबिवली' यांसारख्या हॉरर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. तर 'उलाढाल', 'क्लासमेट्स', 'फास्टर फेणे', 'सतरंगी रे', 'नारबाची वाडी', 'उनाड' असे कित्येक सिनेमे त्यांनी दिग्दर्शित करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. हॉरर सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेले आदित्य सरपोतदार यांनाही सिनेमाचं शूटिंग करताना भीतीदायक अनुभव आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला. 

आदित्य सरपोतदार यांनी नुकतीच 'बोल भिडू'ला 'थामा' सिनेमाच्या निमित्ताने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उलाढाल सिनेमाच्या वेळी त्यांच्या क्रू मेंबरमधील कॉस्ट्युम डिझायनर असलेल्या मुलीसोबत घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "मी मुकेश मिलमध्ये उलाढाल सिनेमाचं शूटिंग करत होतो. आणि दुपारची शिफ्ट होती. आमच्या टीममधली कॉस्ट्यूम डिझायनर दुपारी तिला ब्रेक असल्यामुळे गाडीत एसी लावून झोपली होती. ती दुपारी घामाघुम होऊन सेटवर पळत आली. आणि ती म्हणाली की सर मी घरी जाते. मी तिला विचारलं काय झालं? तेव्हा तिने सांगितलं की सर मी गाडीत झोपले होते. मला वॉशरुमला जावंसं वाटलं. मी लेडीज टॉयलेटमध्ये गेले तेव्हा कुणीच नव्हते. सगळ्या वॉशरुमचे दरवाजे उघडे होते. मी आता शिरताना मला माहीत होतं की आत कोणी नाहीये. मी जेव्हा दरवाजा बंद केला तेव्हा बाजूच्या वॉशरुममधून फ्लश दाबल्याचा आवाज आला. मी घाबरले...मी बाहेर येऊन बघितलं तर कोणीच नव्हतं". 

"मग मला दरवाजाच्या बाहेर पायांचा आवाज आला. मी बाहेर बघितलं तर कुणीच नव्हतं. मी घाबरुन गाडीच्या दिशेने पळत आले. मी गाडीत बसले तेव्हा मला पाठीमागून खांद्यावर कुणीतरी हात ठेवलाय असं वाटलं. मी गाडीतून डायरेक्ट उडी मारली. आणि इथे पळत आले. कुणाला तरी माझ्यासोबत पाठवा मी घरी जाते. असं म्हणून ती गाडीत बसून घरी गेली. आता हे खरंच घडलं? की तिला आवाज आला... ती झोपेत होती म्हणून तिला स्वप्न पडलं माहित नाही. पण तिची समज अशी होती की कुठल्या तरी ज्युनियर आर्टिस्टचं भूत किंवा डान्सरचं भूत आहे. मुकेश मिलमध्ये एकेकाळी आग लागली होती. त्यामुळे तिथे त्या आगीत लोक गेलेत की काय माहित नाही. इतकी वर्ष त्यात शूटिंग होतंय. पण, त्या भागात रात्री मिलच्या भागात लोक सहसा जात नाहीत", असंही त्यांनी सांगितलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ghostly encounter at Mukesh Mills during 'Uladhal' shooting: Director recounts story

Web Summary : During the 'Uladhal' shoot at Mukesh Mills, a costume designer experienced a chilling incident in the restroom, hearing phantom flushes and feeling a touch. She fled, believing it was a dancer's ghost from a past fire.
टॅग्स :सेलिब्रिटी