Join us

पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर..., Ketaki Chitaleवर संतापल्या अभिनेत्री सविता मालपेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:18 IST

Ketaki Chitale, Savita Malpekar : अभिनेत्री केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राजकारण ढवळून निघालं आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राजकारण ढवळून निघालं आहे. केतकीच्या पोस्टचा अनेक राजकीय नेते व कलाकारांनी निषेध व्यक्त केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘जे बोललीस ते शब्द मागे घेतले नाहीस आणि पवार साहेबांची माफी मागितली नाही तर तू जिथे कुठे असशीन तिथून तुला शोधून काढून पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर नावाची सविता मालपेकर नाही,’ अशा शब्दांत त्यांनी केतकीला सुनावलं आहे.सविता यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सविता मालपेकर यांनी केतकीचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

‘कोण आहे ही केतकी? काय लायकी आहे तिची? कतृत्व काय आहे तिचं? एखाद दुसºया सीरिअलमध्ये काम केलंय... हे बघ केतकी, हे जू ते बोलली आहेस, जे तू लिहिलं आहेस... ते तर तू लिहिलं आहेसच. पण तुझा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे, हे आम्हाला माहित आहे. त्याचा तर आम्ही शोध घेऊच त्याआधी मुकाट्याने तूच सांग की तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं? का असं वागता तुम्ही. तुमच्या अशा वागण्यानं सिनेसृष्टीचं नाव खराब होतं, हे कळत कसं नाही तुम्हाला. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबद्दल पुन्हा जर तू असं वागलीस तर तुझी खैर नाही हे लक्षात ठेव. तू कोणत्या माणसाविषयी बोलतेस. त्याचं हिमालयाएवढं कतृत्व आहे. तू क्षुद्र आहेस तुझी लायकीही नाही. आता तू माझ्या समोर असतीस तर मी तुझं काय केलं असतं हे मला सांगता येत नाहीये. 

याच्यापुढे जर तू असं काही बोललीस तसेच जे बोललीस ते शब्द तू मागे घेतले नाहीस आणि पवार साहेबांची माफी मागितली नाही, तर जिथे कुठे असशील तिथून शोधून काढून, पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर नावाची सविता मालपेकर नाही. तुझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा मी तुला पाठिशी घातलं होतं आणि तू चुकीची वागलीस तर मी तुला शिक्षाही करू शकते,’ अशा शब्दांत सविता यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान या प्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :केतकी चितळेशरद पवार