मराठी सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवले आहे. आपल्या अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांचे नाव आघाडीवर होतं. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. पण या अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवट मात्र अनपेक्षित आणि थरारक होता. वयाच्या ३२व्या वर्षी कार अपघातात त्यांच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं झालं. त्या दुर्घटनेबद्दल प्रसिद्ध सिनेपत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
प्रसिद्ध सिनेपत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी नुकतेच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या अपघाताबद्दलही सांगितले. त्या म्हणाल्या की, अनिता पाध्ये बऱ्याचदा रंजनासोबत असायच्या त्यामुळे रंजनाबद्दल त्यांना खूप जवळून जाणुन घेता आलं. याबद्दल त्या म्हणतात की, "सिनेमाच्या शूटिंगला जाताना रंजूताईचा अपघात झाला. त्या अपघातानंतर तिला बघणं क्लेशदायक होतं. तिच्या चेहऱ्याला काहीच नव्हतं झालं. अगदी सुंदर जसाच्या तसा चेहरा होता तिचा, पण शरीर मात्र पॅरलाइज्ड झालं होतं. अपघातात तिचा एक हात गळाला होता म्हणजे १०-१२ फुटांवर जाऊन पडला तो तिने सरकत जाऊन आणला होता. रंजनावर ४ ऑपरेशन झाली होती. त्यांच्याघरी कॉर्डलेस फोन असायचा जो तिला कानाला लावायला ५ मिनिटं लागायची.
त्या पुढे म्हणाल्या की, ती माझ्याशी अशोक मामाबद्दल नेहमी बोलायची. ती खूप जिद्दी होती शेवटी ती नाटकातून परत आली पण व्हिलचेअरवर बसून. इतकी सुंदर अभिनेत्री पण तिचे हे असं व्हावं हे खूप क्लेशदायक होतं. या इंडस्ट्रीचं असं आहे की कोणाचं करिअर बाद झालं की कोणीही त्याला भेटायला जात नाही."