प्रिया बापट ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्रिया सध्या हिंदी-मराठी प्रोजेक्टसमध्ये काम करत आहे. प्रिया बापट मराठी रंगभूमीवरही सक्रीय आहे. प्रिया बापट अभिनेता उमेश कामतसोबत जर तरची गोष्ट नाटकात अभिनय करतेय. प्रिया-उमेश हे रिअल लाइफ कपल नाटकातही एकत्र काम करत आहेत. प्रिया बापटने एका मुलाखतीत मराठी रंगभूमीवरील तिचं प्रेम व्यक्त केलंय.
अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली की, "जर तरची गोष्ट नाटक करायचा निर्णय मी दादा एक गुड न्यूज नाटकानंतर घेतला. त्याआधी नवा गडी नवं राज्य करताना मला घशाचा खूप त्रास व्हायला लागला. माझ्या वोकल कॉर्ड्सची स्ट्रेन्थ काय आहे हे मला माहितीये. नाटकामध्ये खूप प्रोजेक्शन लागतं. त्यामुळे हे सर्व मला झेपत नव्हतं. त्यात मला सिनेमा जास्त आकर्षित करत होता. त्यामुळे मी फार नाटकाकडे वळले नाही. घशाची काळजी घ्यावी असं मला वाटलं."
प्रिया बापट पुढे म्हणाली की, "दोन नाटकांनी माझ्यावर खूप प्रभाव पाडला. एक म्हणजे संगीत देवबाभळी मी पाहिलं. मला तेव्हा वाटलं की असं काहीतरी करायला पाहिजे. हे नाटक छान आहे. दुसरं म्हणजे दादा एक गुड न्यूज आहे नाटकाची जेव्हा मी निर्मिती केली. त्या सर्व प्रोसेसमध्ये मी होते. ती प्रोसेस मला प्रचंड आवडली. एका छोट्याश्या जंपपासून संपूर्ण नाटक स्टेजवर आणणं, ही फार छान गोष्ट होती."
प्रिया शेवटी म्हणाली की, "जर तरची गोष्ट नाटकाच्या प्रयोगाला जेव्हा मी प्रेक्षकांसमोर गेले. तेव्हा माझ्या नावावर प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकल्या. तेव्हा ऑडियन्समधून लोक ओरडायला लागले की, तुम्ही आणि उमेशने एकत्र येऊन नाटक करा. तेव्हा मला फार छान वाटलं. तुमच्यासाठी लोक थिएटरमध्ये येतात ही फार मोठी गोष्ट आहे. हे कमवायला वर्षानुवर्ष लागतात."