Join us

"ग्रुपिझम आहे, ते तोडणं कठीण...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची खरी बाजू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:58 IST

"आपण कितीही मेहनत घेतली तरी...", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल भार्गवी चिरमुलेने व्यक्त केलं मत

Bhargavi Chirmule : बॉलिवूड इंडस्ट्रीतील ग्रुपिझम बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतं. त्यात आता गेल्या काही वर्षात मराठी सिनेइंडस्ट्रीतही याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. याबद्दल अनेकदा कलाकारही व्यक्त होताना दिसतात. या ग्रुपिझमचा परिणाम अर्थात कलाकारांच्या कामावर होताना दिसतो. अशातच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने (Bhargavi Chirmule) या ग्रुपिझमवर आपलं मत व्यक्त केलं आहे. 

भार्गवी चिरमुलेने नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. थेट भाष्य केलं आहे. याच दरम्यान, अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे का असं प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी बोलताना ती म्हणाली, "ग्रुपिझम आहे, शंभर टक्के आहे. आणि ते त्यांच्या कंफर्ट झोनमध्ये काम करतात. हे चुकीचं आहे बरोबर, यामध्ये मला पडायचं नाही. पण, आपण तिथपर्यंत पोहोचणं फार कठीण झालं आहे. जे फिल्म्सच्या बाबतीत घडताना दिसतं. फिल्म्समध्ये तर ग्रुपिझम दिसतो. ते त्यांच्या लोकांना घेऊन सिनेमे करतात पण, ते त्यांच्या कंफर्टझोनमधून बाहेर येत नाहीत. त्यामुळे वेगळ्या कलाकारांना एक्सप्लोर करत नाहीत. ते आपल्याला भेट, बोलतात, अरे, आपण एकत्र काम करु, पण ते आपल्याबरोबर काम करत नाहीत."

पुढे अभिनेत्री म्हणाली, "त्यांच्या सगळ्या प्रिमिअर्समध्ये आपण जातो, पार्टीमध्ये जातो. यशामध्ये सहभागी होतो. पण, त्यांच्या सिनेमात आपण नसतो, याचं एक कलाकार म्हणून वाईट वाटतं. कारण आम्हालाही एक कलाकार म्हणून तुमच्याबरोबर  काम करायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. आम्हाला तुमच्याकडून शिकायचं आहे पण ते आमच्याकडे आणि काही कलाकारांपर्यंत पोहोचत नाही. सगळ्यांचे आपापले ग्रुप आहेत. आणि ते ग्रुप फोडणं फार कठीण आहे. त्यांच्या प्रत्येक ग्रुपमध्ये असे कलाकार आहेत जे वेगवेगळ्या  पद्धतीची काम करु शकतात. त्यांनी त्यांचं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे. आणि आपण कितीही मेहनत घेतली तरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे. माझ्यासारखे अनेक कलाकार आहेत जे सध्या या गोष्टींचा सामना करत आहेत. एकतर ते आम्हाला कलाकार मानत नाहीत, असं मला वाटायला लागलंय किंवा आपल्याबरोबर काम करुन त्यांना काही फायदा होणार नाही, असं असावं"

वर्कफ्रंट

भार्गवी चिरमुले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. विविध मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून या अभिनेत्रीने कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच भार्गवी चिरमुले एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. भार्गवीने 'वहिनीसाहेब','आई मायेचा कवच'  या मालिकांमध्ये काम केले आहे. तर 'वन रुम किचन','संदुक' यासारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :भार्गवी चिरमुलेसेलिब्रिटी