Join us

‘’नेपोटिझमचा निवाडा करणं रसिकांच्याच हातात’’- शरद केळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 18:36 IST

अभिनयाचा वारसा त्याला घरातून लाभला असला तरी त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे अभिनय कौशल्य असेल ते कलाकार हिट होतातच.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड वर्तुळात घराणेशाही अर्थात नेपोटीझमचा वाद चांगलाच पेटला आहे. ज्यामध्ये काही बड्या नावांवर बी- टाऊनमधील निवडक कलाकारांनी निशाणा साधला. प्रस्थापितांकडून मिळालेल्या वागणुकीमुळं आणि कारकिर्दीत अपेक्षित संधीच हिरावल्या गेल्यामुळं अनेकांवर इंडस्ट्रीला राम राम ठोकल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर चित्रपटसृष्टीतील  सुरू असणा-या घराणेशाहीवर अभिनेता शरद केळकरनेही आपले मत मांडत सांगितले की, चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीला बऱ्याच अंशी रसिक जबाबदार आहे असं मला वाटतं. कारण कोणत्याही कलाकाराला रसिकच मोठं करतात. यात बाहेरुन आलेला असो किंवा मग इथला; कलाकारांचं भवितव्य रसिक ठरवतात. आता हेच पाहा, बाहेरून आलेल्या कलाकारांच्या नावाने शिमगा करणारे त्यांचे सिनेमे जाऊन पाहतात. त्यामुळे त्यांचे सिनेमे हिट होतात, त्यांना फॅन फॉलोईंग मिळतो आणि नवनवे सिनेमे त्यांच्या पदरात पडतात. जर तुम्हाला एखादा कलाकार बाहेरचा आहे असं वाटतं, तर तुम्ही त्यांचे सिनेमा पाहू नका. त्यानंतर तो हिट झाला तर मग आरडाओरडा कशाला करायचा?

 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराणेशाहीमधून येणारे प्रत्येक कलाकार हिट होतातच असे नाही. प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. आता हेच पाहा रणबीर कपूर किती चांगला आणि गुणी कलाकार आहे. त्याचे वडीलही उत्तम आणि प्रसिद्ध अभिनेते होते. रणबीरचा लूक चांगला, त्याचा अभिनय चांगला, त्याचा डान्स चांगला आणि त्याला अभिनयाचा वारसा त्याला घरातून लाभला असला तरी त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे अभिनय कौशल्य असेल ते कलाकार हिट होतातच.

पूर्वीच्या काळात अनेक निर्मात्यांची मुलं मुली सिनेमात आले. मात्र त्यांचे सिनेमे म्हणावे तसे चालले नाहीत. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनला तरी मुलाला स्वतःला सिद्ध करावे लागते. त्याच्यात कौशल्य नसेल तर कुणी पेशंट त्याच्याकडे का येतील. तसंच कलाकारांचं आहे. घराणेशाही वाटत असली तरी कलाकारांच्या अभिनयावर सगळं असतं आणि ते ठरवण्याचा अधिकार मायबाप रसिकांच्या हातात आहे असं मी मानतो. सिनेमा आणि कलाकारांबाबत आवडनिवड ठरवणे हे सर्वस्वी रसिकांच्या हातात आहे. जेव्हा रसिक योग्य विचार करतील त्याचवेळी बदल घडलेला पाहायला मिळेल.

टॅग्स :शरद केळकर