Join us

अभिनेता पृथ्वीक प्रताप दिसणार 'या' लघुपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 17:32 IST

अभिनेता पृथ्वीक प्रताप हा झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘जागो मोहन प्यारे’ मधील राहुलची भूमिका साकारणारा एक विनोदी पात्र आहे.

सध्या ‘स्वच्छ भारत अभियान’ सर्वांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. स्वच्छ भारत हवा असेल तर त्याची सुरवात ही स्वतःपासून केली पाहिजे. असंच काहीसं झी मराठी फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याने केले आहे. स्वच्छतेचा संदेश देणारा लघुपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या या लघुपटामध्ये मुख्य भूमिका या अभिनेत्याने साकारली आहे.  एकही संवाद नसलेल्या या लघुपटामध्ये फक्त चेहऱ्यारील हावभावाच्या मदतीने पृथ्वीक ने खुप चांगला संदेश लोकांना देण्याचा उत्तम प्रयत्न केला. त्याच्या सहज अभिनय करण्याच्या कलेमुळे हा लघुपट बघताना प्रत्येक प्रेक्षकाला कनेक्ट झाला आहे. पृथ्वीक आपल्या लघुपटाद्वारे एक समंजस विचार मांडणारा विषय हाताळताना दिसत आहे.

  पृथ्वीक प्रताप हा झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘जागो मोहन प्यारे’ मधील राहुलची भूमिका साकारणारा एक विनोदी पात्र आहे. शाळेतील आयुष्यावर आधारित विनोद गायकर लिखित ‘बॅकबेंचर्स’ वेबसिरीज मध्ये विनोदी-मस्तीखोर पात्र साकारणारा आहे. नुकतेच ‘निर्भय-एक व्यासपीठ’  या मासिका तर्फे पृथ्वीक प्रतापला अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेमध्ये  महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

  सध्या कचऱ्याचे प्रमाण खुप वाढले आहे, त्याचबरोबर कचऱ्याच्या वाढत्या ढिगामुळे आणखी एक समस्या उद्भवली आहे ती म्हणजे स्वच्छतेच्या अभावाची. हल्ली लोक इतक्या सर्रासपणे रस्त्यावर कचरा टाकतात की भविष्यात यांचे काय परिणाम उद्भवतील या बद्दलची जराही जाणीव  त्यांना नसते. मागच्याच पावसाळ्यात मरीन ड्राईव्ह येथील समुद्रातुन कचरा पुन्हा बाहेर फेकला गेला होता. या अश्याच समस्येला समोर ठेवुन ‘टफएग्स स्टुडिओ’ या तरुण वर्गातील ग्रुपने मिळुन ‘कचरा’या सध्याच्या ज्वलंत विषयावर भाष्य करणारा ‘वेकअप’ नावाचा लघुपट तयार केला आहे. या लघुपटाची मूळ संकल्पना अनिकेत कदम यांची आहे तर तिलोत्तम पवार यांनी दिग्दर्शन केले आहे. 

 बऱ्याचदा काही लोक कचरा हा कचराकुंडीत न टाकता आपल्या सोयीप्रमाणे रस्यात कुठेही  टाकताना आपल्याला सहज दिसतात. हीच कचरा टाकतानाची गंमत या लघुपटातून अगदी सहज दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. निसर्ग आपल्याला इतकं भरभरुन देतो तर आपण ही निसर्गाच काहीतरी देणे लागतो, ही जाणीव करुन देणारा आणि अश्या लोकांना वेळीच समज देण्याचा चांगला प्रयत्न ‘वेकअप’ लघुपटातून केला गेला. तर हा लघुपट नक्कीच प्रत्येकाने पहावा असाच आहे.

टॅग्स :झी मराठीपृथ्वीक प्रताप