अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. आणि ही जोडी सिने पडद्यावर एकत्र दिसण्याआधीपासूनच यांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ललित व ऋता 'आरपार' या सिनेमातून पहिल्यांदाच रुपेरी पडदा गाजवणार आहेत. रोमँटिक कथा असलेल्या या सिनेमात ललित व ऋता यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं, प्रेम हे प्रेम असतं’, अशी टॅगलाईन या चित्रपटाला आहे. या चित्रपटाची खास बात म्हणजे हा सिनेमा सिनेप्रेमींच्या भेटीसाठी एका खास दिवशी येणार आहे. तसेच या चित्रपटाचा टिझरही प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
'आरपार' चित्रपटाचा टीझर
ललित प्रभाकर व हृता दुर्गुळे या दोघांच्याही वाढदिवसादिवशी म्हणजे १२ सप्टेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ललित व हृता यांचा वाढदिवस १२ सप्टेंबरला असतो आणि याच दिवशी त्यांचा हा पहिल्यांदाच एकत्रित काम केलेला 'आरपार' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दोन्ही कलाकारांसाठी ही अगदीच आनंदाची बाब आहे. आणि या कलाकारांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणायला हवी. हृता व ललित यांनी या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्रित काम केलं आहे. अर्थात ही जोडी एकत्र खूपच सुंदर दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावणारा आहे.
'आरपार' या चित्रपटाचा टीझरही प्रेमी युगुलांना संभ्रमात पाडणारा आहे. टीझर पाहून ऋता व ललित यांचा रोमँटिक अंदाज चित्रपटात पाहायला मिळणार की त्यांच्यातील वाद-विवाद आणि दुरावा हे अद्याप स्पष्ट होत नाही आहे. अर्थात हा टीझर ऋता व ललित यांच्यातील प्रेम आणि दुरावा याचे समीकरण असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेमात वेड लावायची ताकद असते फक्त पार्टनर चांगला मिळायला हवा, हे टीझर पाहून स्पष्ट होतंय. टीझर पाहून अखेर ही जोडी एकमेकांना सोडून तर जाणार नाही ना हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
'लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी' प्रस्तुत, निर्माते नामदेव काटकर, रितेश चौधरी निर्मित 'आरपार' हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा हृता व ललित या नव्या जोडीसह १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.