प्रेम ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होते आणि मराठी सिनेमांनी ही भावना विविध पैलूमधून प्रेक्षकांसमोर मांडली आहे. कधी गोडसर पहिलं प्रेम, कधी नात्यांमधील दुरावा, तर कधी वेदनांनी भरलेली अधुरी कहाणी. प्रत्येक रूपात प्रेमाचं सौंदर्य मराठी चित्रपटांनी प्रभावीपणे उभं केलं आहे. अशीच एक प्रेमकथा शशिकांत धोत्रे हे सजना या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलेत. केवळ प्रेम नाही, तर त्या प्रेमाच्या वाटचालीतून फुलणाऱ्या भावना, संघर्ष आणि बदलते नाते यांचं प्रभावी चित्रण 'सजना' (Sajana Movie) सिनेमात करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा आज पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
'सजना' हा चित्रपट एक नाजूक प्रेमकहाणी उलगडतो, जिथे निरागसतेने सुरु झालेलं नातं एका महत्वाच्या टप्प्यावर येतं आणि शेवटी तेच नातं एका वेगळ्याच रूपात समोर येतं. कधी विश्वासघात, कधी प्रतिशोध आणि कधी अंतर्मनाला हलवून टाकणारी वेदना. इतकच नव्हे तर या सिनेमातील संगीत देखील या प्रेमकथेची एक विशेष आत्मा आहे. आता पर्यंत रिलीझ झालेले चित्रपटातील गीत प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत.
'सजना' या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. चित्रपटाचं छायाचित्रण रणजित माने ह्यांनी केलं आहे. तर संगीत ओंकारस्वरूप ह्यांचं असून सिनेमातील रोमान्टिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनले आहेत. 'सजना' हा सिनेमा २७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.