Join us

डॉली आणि संद्याच्या प्रेमकहाणीला विनोदी तडका, 'विषय हार्ड'चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 17:18 IST

'विषय हार्ड' (Vishay Hard Movie) हा चित्रपट ५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

विषय हार्ड (Vishay Hard Movie) चित्रपटातील येडं हे मन माझं... हे सुमधूर प्रेमगीत इंटरनेट आणि टीव्हीवर तीन लाखांहून अधिक लोकांनी बघितले आहे. या प्रेमगीता मागोमाग 'विषय हार्ड' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा चालू आहे. सिनेइंडस्ट्रीला नेहमीच नव्या कल्पनांची गरज असते, अशीच एक नवी कल्पना घेऊन हा चित्रपट ५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  

'दादा, लय मजा येणार हाय... , अरे नुसती मजाच येणार नाय तर,  विषयच हार्ड होणार हाय…' . टीझरमधील हा डायलॉग 'विषय हार्ड'मध्ये घडणाऱ्या विनोदाची कल्पना देतो. डॉली आणि संद्याची प्रेमकहाणी यात आहे, पण ही प्रेमकहाणी पूर्ण होताना जो गोंधळ उडतो, तो विनोदी शैलीमध्ये मांडण्यात आला आहे. पर्ण पेठे आणि सुमित या जोडीने ही गुलाबी प्रेमकथा अतिशय उत्तम प्रकारे साकारलेली आहे, त्याशिवाय प्रेमकथेतील गोंधळ सहकलाकारांनी ज्या पद्धतीने मांडला आहे, त्याने हा चित्रपट प्रेक्षकांना अखेरच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवण्यासाठी यशस्वी ठरणार आहेच, पण मोशन पोस्टर, प्रेमगीत आणि आता टीझर यांमुळे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

५ जुलैला रिलीज होणारा हा चित्रपट पाहण्यावाचून प्रेक्षकांकडे आता दुसरा कोणताच पर्याय नाही..' असंच जणू हा टीझरच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी तयार केलेला हा चित्रपट नवी आशा घेऊन आलेला आहे. छायाचित्रणासोबतच गीत-संगीताला नावीन्याचा स्पर्श करत तांत्रिक बाबींमध्येही हा चित्रपट लक्षणीय बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मूळात इंजिनियर असणाऱ्या सुमितने चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर लघुचित्रपट, टीव्ही एपिसोड्स, रिॲलिटी शोज, जाहिराती अशा माध्यमातून दहा वर्षे काम केले आणि आपल्या अनुभवाच्या पायावर 'विषय हार्ड 'ची निर्मिती केली. हा टीझर बघून 'विषय हार्ड' ही गोष्ट शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील लोकांना आपल्याच भागात घडणारी गोष्ट वाटत आहे.

गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील यांनी बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज या बॅनरखाली 'विषय हार्ड'ची निर्मिती केली आहे. कथा लेखनासोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शनही सुमित यांनी केलं आहे. पर्ण पेठे आणि सुमित यांच्यासह हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकार आहेत. गीतकार नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी लिहिलेल्या गीतांना साहिल कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे. डिओपी अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी, तर कोरिओग्राफर ओंकार शेटे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. कला दिग्दर्शन स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांचं असून, सौरभ प्रभुदेसाई यांनी केली आहे. सायली घोरपडे वेशभूषा केलेल्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संदीप गावडे आहेत.

टॅग्स :पर्ण पेठे